`फडणवीस, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर हे तिघे आतून एक असून त्यांची...`; राऊतांचा सवाल
Maharashtra Assembly Election 2024 Sanjay Raut: `महाराष्ट्राचे अर्थकारण व प्रतिष्ठा मोडीत काढण्याचा दिल्ली-गुजरातचा उद्योग मराठी प्रजेने रोखायला हवा. राज्याची वाट लागली आहे,` असंही खासदार संजय राऊत यांनी म्हटल आहे.
Maharashtra Assembly Election 2024 Sanjay Raut: "मालवणातील शिवरायांचा भव्य पुतळा भ्रष्टाचारामुळे उन्मळून पडला. भाजपच्या ठेकेदारांना पैसे खाता यावेत व या पैशांतून निवडणुका लढता याव्यात म्हणून या लोकांनी छत्रपतींनाही सोडले नाही," अशी टीका उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. "छत्रपती शिवरायांचे मंदिर प्रत्येक जिल्ह्यात उभारू व त्यातून जनतेने स्वाभिमानाची प्रेरणा घ्यावी, अशी घोषणा आता उद्धव ठाकरे यांनी करताच या सर्व भ्रष्ट ठेकेदारांचे नेते फडणवीस चिडले व त्यांनी शिवरायांची मंदिरे उभारू या घोषणेची चेष्टा-मस्करी सुरू केली. हे संतापजनक आहे," असंही राऊत यांनी आपल्या 'रोखठोक' या सदरामध्ये म्हटलं आहे.
फडणवीस यांनी हे आव्हान शिंदे यांना दिले
“हे छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे बांधायला निघाले आहेत. आधी मुंब्य्रात शिवरायांचे मंदिर बांधून दाखवा,” अशी चेष्टेखोर भाषा करणाऱ्या फडणवीस यांच्या पोटातले विष हे असे बाहेर येते. फडणवीस यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, मुंब्रा पाकिस्तानात नाही. ते भारतात व महाराष्ट्रातच आहे व मुंब्य्राच्या प्रवेशद्वारावर शिवरायांचा भव्य पुतळा आहे. दुसरे असे की, त्यांचे मुख्यमंत्री शिंदे हे ज्या ठाणे जिल्ह्यातून येतात, त्यात मुंब्राही आहे. म्हणजे फडणवीस यांनी हे आव्हान शिंदे यांना दिले," असं राऊत यांनी म्हटलं आहे.
हे तिघे आतून एक आहेत व त्यांची...
"मुंब्य्रात शिवरायांचे मंदिर उभारायचे म्हटले तर कोणीच विरोध करणार नाही. लालबागच्या राजासह अनेक गणेश मंडळांचे स्वागत मुंबईतील सर्वच मुस्लिम मोहोल्ल्यांत होत असते. त्यामुळे धार्मिक दंगली घडविण्याचे भाजपचे मनसुबे बाद होतात. ‘धर्म हा माणसाच्या रक्षणासाठी आहे, तो त्याचा विध्वंस करण्यासाठी नाही,’ अशा आशयाचे जे पत्र त्या काळात छत्रपतींनी औरंगजेबाला पाठविले ते आजही उपलब्ध आहे. फडणवीसांनी ते एकदा समजून घ्यायला हवे. आपल्या कारभारात आणि सैन्यात सर्व धर्मांचे लोक शिवरायांनी घेतले होते आणि म्हणूनच ते महाराष्ट्राच्या शत्रूशी लढू शकले. फडणवीस, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर हे कोणाशी व कोणासाठी लढत आहेत? हे एकदा महाराष्ट्राला कळू द्या. हे तिघे आतून एक आहेत व त्यांची हातमिळवणी आहे. या भ्रमातून कसे बाहेर पडायचे?" असा सवाल राऊत यांनी केला आहे.
नक्की वाचा >> 'ही' भीती असल्याने CM शिंदेंनी राज ठाकरेंच्या लेकाविरुद्ध उमेदवार दिला; राऊतांचा दावा
दादर, माहीम, परळ, आपले स्वत्व सोडणार नाही
"वंचितांचे राजकारण करणारे प्रकाश आंबेडकर व राज ठाकरे हे उघडपणे मोदी-शहांच्या महाराष्ट्रविरोधी राजकारणावर बोलायला तयार नाहीत. महाराष्ट्राची सर्व संपत्ती गुजरातकडे ओढली जात आहे व उद्या महाराष्ट्राला भिकेचा कटोरा घेऊन बिहारप्रमाणे कायम दिल्लीच्या दारात उभे राहावे लागेल, अशी परिस्थिती मोदी-शहांनी निर्माण केली. हे सर्व ज्यांना वेदना देत नाही त्यांच्याकडून महाराष्ट्र कोणतीही अपेक्षा ठेवत नाही, पण या हटवादात प्रकाश आंबेडकरांचे जे अकोल्यात झाले त्याच अकोल्याची पुनरावृत्ती दादर-माहीमला होईल हे स्पष्ट दिसते. दादर येथे शिवसेनेचा जन्म झाला. त्यामुळे येथील मतदार उद्धव ठाकरे यांच्याच मागे उभे राहतील. दादर, माहीम, परळ, आपले स्वत्व सोडणार नाही," असं राऊत यांनी म्हटलं आहे.
मोदी-शहा-फडणवीस ही माणसे महाराष्ट्राला परवडणारी नाहीत
"महाराष्ट्राच्या मेरू पर्वतास भ्रष्टाचाराच्या मुंग्यांनी पोखरले आहे. भ्रष्टाचाराने सचोटीस गिळावे असा हा मामला निवडणुकीत चर्चेत असताना काळ्या पैशाचे धनी सर्वत्र अरेरावी करीत वावरत आहेत. महाराष्ट्राचे अर्थकारण व प्रतिष्ठा मोडीत काढण्याचा दिल्ली-गुजरातचा उद्योग मराठी प्रजेने रोखायला हवा. राज्याची वाट लागली आहे. ती अधिक लागू नये व ज्यांनी ही वाट लावली त्यांना पुन्हा संधी मिळू नये, या ईर्षेने मतदान व्हायला हवे. उत्तरेचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येतात व त्यांच्या स्वागतासाठी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी पोस्टर्स व घोषणा होतात. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. मोदी-शहा-फडणवीस ही माणसे महाराष्ट्राला परवडणारी नाहीत," असं राऊत यांनी म्हटलं आहे.
मुंब्य्रापासून दादर-माहीमपर्यंत...
"मराठी माणसांत फूट पाडून त्यांना वेगळे राज्य करायचे आहे. राष्ट्राच्या एकतेवर, कायद्याच्या राज्यावर विश्वास ठेवणारे सर्वच जाती-धर्माचे लोक मोदी, शहा, फडणवीस यांचा पराभव करू इच्छितात. त्यांची इच्छा सफल होईल, असे वातावरण आज महाराष्ट्रात आहे. मुंब्य्रापासून दादर-माहीमपर्यंत हेच वातावरण आहे. चिंता नसावी," असं लेखाच्या शेवटी राऊतांनी म्हटलं आहे.