`ही` भीती असल्याने CM शिंदेंनी राज ठाकरेंच्या लेकाविरुद्ध उमेदवार दिला; राऊतांचा दावा
Maharashtra Assembly Election 2024: उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या राजकीय भूमिकेवरुन खोचक शब्दांमध्ये निशाणा साधल्याचं दिसत आहे.
Maharashtra Assembly Election 2024: "नरेंद्र मोदी व अमित शहा हे महाराष्ट्राचे शत्रू अहेत. त्यांना महाराष्ट्रात घुसू देऊ नका, अशी गर्जना करणारे राज ठाकरे हे आता मोदी व शहांच्या गरब्यात सामील झाले व महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचा, म्हणजे मोदी-शहा ठरवतील तोच होईल हे मान्य करून भाजपच्या मदतीसाठी ते बाहेर पडले. राज ठाकरे यांनी त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना दादर-माहीम विधानसभेतून उभे केले व चिरंजीव अमित यांच्या विजयासाठी त्यांना भाजपची मदत हवी. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र आपले उमेदवार उभे केले. अमित ठाकरे हे तरुण आहेत व त्यांना निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. राजकारणात जास्तीत जास्त चांगल्या तरुणांनी यावे असे सगळ्यांनाच वाटते. प्रश्न इतकाच आहे की, एक जागा जिंकता यावी यासाठी ‘मनसे’ने भाजपास इतर सर्वत्र मदत होईल अशी भूमिका घेतली," असं संजय राऊत यांनी 'सामना'मधील 'रोखठोक' या सदरामध्ये म्हटलं आहे.
राज ठाकरेंनी एका जागेसाठी संपूर्ण महाराष्ट्राचा स्वाभिमान पणाला लावला
"एका दादर-माहीम मतदारसंघासाठी राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा स्वाभिमान पणाला लावला आहे व शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत टीका करीत सुटले आहेत. राज ठाकरे यांना नक्की काय सांगायचे आहे? याबाबत गोंधळाचे चित्र नेहमीच निर्माण होते. शिवसेना व धनुष्यबाण ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच प्रॉपर्टी असल्याचे ते आता सांगत आहेत. ही प्रॉपर्टी बाळासाहेबांची हे त्यांना दोन वर्षांनी समजले व ते बोलून गेले, पण ज्यांनी ही प्रॉपर्टी चोरली व एकनाथ शिंदेंच्या हातावर उदक ठेवावी तशी ठेवली त्या मोदी-शहा-फडणवीस यांच्या समर्थनासाठी राज ठाकरे आज उभे आहेत. हे कसे काय?" असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे.
उघडपणे मोदी-शहांच्या महाराष्ट्रविरोधी राजकारणावर बोलायला तयार नाही
"वंचितांचे राजकारण करणारे प्रकाश आंबेडकर व राज ठाकरे हे उघडपणे मोदी-शहांच्या महाराष्ट्रविरोधी राजकारणावर बोलायला तयार नाहीत. महाराष्ट्राची सर्व संपत्ती गुजरातकडे ओढली जात आहे व उद्या महाराष्ट्राला भिकेचा कटोरा घेऊन बिहारप्रमाणे कायम दिल्लीच्या दारात उभे राहावे लागेल, अशी परिस्थिती मोदी-शहांनी निर्माण केली. हे सर्व ज्यांना वेदना देत नाही त्यांच्याकडून महाराष्ट्र कोणतीही अपेक्षा ठेवत नाही, पण या हटवादात प्रकाश आंबेडकरांचे जे अकोल्यात झाले त्याच अकोल्याची पुनरावृत्ती दादर-माहीमला होईल हे स्पष्ट दिसते. दादर येथे शिवसेनेचा जन्म झाला. त्यामुळे येथील मतदार उद्धव ठाकरे यांच्याच मागे उभे राहतील. दादर, माहीम, परळ, आपले स्वत्व सोडणार नाही," असं राऊत यांनी म्हटलं आहे.
शिंदेंना 'ही' भीती असल्याने अमित ठाकरेंविरुद्ध उमेदवार दिला
"भाजप आज महाराष्ट्राचा ‘एक नंबर’चा शत्रू आहे हे पहिले व देवेंद्र फडणवीस यांना मदत करणे म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शत्रूंना मदत करणे हे दुसरे. एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराने येथे राज ठाकरे यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली. राज ठाकरे यांनी शिवसेना फुटीच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीचे समर्थन केले. कारण हे सर्व उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घडले. त्याचा आनंद राज ठाकरे यांना झाला असावा. या काळात मुख्यमंत्री शिंदे व राज ठाकरे यांच्यात अनेकदा बैठका झाल्या. एकमेकांकडे जात राहिले, पण राजकारणात राज्यापेक्षा स्वार्थ पुढे रेटला जातो. राज ठाकरे यांना शिंदेंपेक्षा फडणवीस जवळचे वाटतात. कारण ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांची सूत्रे दिल्लीतील शहा-मोदींकडे आहेत व शिंदे यांना राज ठाकरे यांचे वर्चस्व मान्य होणार नाही. शिंदे हे लोकनेते नाहीत व कधीच होऊ शकणार नाहीत. पैशाने जमवलेल्या गर्दीचे तात्पुरते नेते आहेत व फडणवीस-राज ठाकरे एकत्र येऊन आपला काटा काढीत असल्याच्या भयाने ते सध्या पछाडले आहेत. त्यामुळे दादर-माहीम मतदारसंघात राज ठाकरे यांच्या चिरंजीवांचा पराभव व्हावा यासाठी ते पुन्हा एकदा गुवाहाटीस कामाख्या देवीचे दर्शन करून परतले असतील," असा टोला राऊत यांनी लगावला आहे. दादर-माहीम मतदारसंघातून अमित ठाकरेंविरुद्ध शिंदेंच्या पक्षाचे सदा सरवणकर निवडणुकीच्या रिंगात आहेत.
दिल्लीचे तळवे चटणारे राजकारणी
"ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एकेकाळी मोगल सत्तेशी लढून पहिले हिंदवी स्वराज्य स्थापन केले व मऱ्हाटा स्वाभिमानाचे पाणी जगाला दाखवले त्याच महाराष्ट्रात शिवरायांशीच वैर घेणारे व दिल्लीचे तळवे चटणारे राजकारणी निर्माण झाले. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अशा सर्वच महाराष्ट्रद्वेष्ट्यांचे मुखवटे गळून पडले. महाराष्ट्र हाच एक धर्म आहे व ही निवडणूक म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे धर्मयुद्ध आहे. या धर्मयुद्धात कोण कोणाच्या बाजूने उभा राहील ते पाहणे मनोरंजक ठरेल," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.