Maharashtra Assembly Election 2024: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. इस्लामपूरचे आमदार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच रविवारी रात्री यासंदर्भातील अधिकृत घोषणा आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन केली आहे. विशेष म्हणजे ही घोषणा करताना माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे पुत्र आणि पहिल्यांदाच विधानसभेत आमदार म्हणून निवडून आलेल्या रोहित पाटील यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच शरद पवारांचे निकटवर्तीय असलेल्या जितेंद्र आव्हाडांच्या खांद्यावरही पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे.


जयंत पाटील यांनी काय घोषणा केली?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयंत पाटील यांनी रविवारी रात्री 8 वाजून 53 मिनिटांनी केलेल्या पोस्टमध्ये "राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी डॉ. जितेंद्र आव्हाड, मुख्य प्रतोद पदी रोहित आर. आर पाटील आणि प्रतोद पदी उत्तम जानकर यांची निवड करण्यात आली," अशी घोषणा केली. तसेच पुढे बोलताना, "मी तिघांचेही मनापासून अभिनंदन करतो व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो," असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. यंदा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अवघे 10 आमदार निवडून आलेले आहेत. मात्र त्यामध्ये अनेक अनुभवी आमदार असतानाही पक्षाने रोहित पाटील यांच्यावर विश्वास ठेवत महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे.  



प्रतोद कोण असतो तो काय काम करतो?


प्रत्येक राजकीय पक्षाकडून विधिमंडळ किंवा संसदीय सभागृहांमधील कामकाजासाठी एक प्रतोद नेमला जातो. आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांवर नियंत्रण ठेवण्याचं काम प्रतोद करतो. विधानसभेत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर मतदान करताना प्रतोद फार महत्त्वाची भूमिका बजावतो. विधीमंडळातील नियोजित मतदान किंवा चर्चेच्या वेळी त्या पक्षाने सरकारच्या बाजूने मतदान करायंच की विरोधात यासंदर्भातील पक्षाच्या भूमिकेनुसार प्रतोद आदेश जारी करतो. प्रतोद जो आदेश जारी करतो त्यालाच ‘पक्षादेश’ असं म्हणतात. असा आदेश काढण्यास 'व्हिप काढाणे' असंही म्हणतात. व्हिप काढण्याचे अधिकार प्रतोदाला असला तरी त्या प्रतोदाची निवड पक्षाचा विधिमंडळ नेत्याकडून केली जाते. पक्षाचे विधिमंडळ सदस्य म्हणजेच निवडून आलेले आमदार विधीमंडळ नेता निवडतात.


सर्वात तरुण आमदार


रोहित पाटील हे 15 व्या विधानसभेमधील सर्वात तरुण आमदार ठरले असून आता त्यांच्यावर पक्षाने ही नवीन जबाबदारीही सोपवली आहे. कायद्याचे शिक्षण घेतलेले रोहित पाटील ही जबाबदारी उत्तम पद्धतीने पार पाडतील असा पक्षाला विश्वास आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये रोहित पाटील यांना शरद पवार यांच्या राष्ट्रावादी काँग्रेसकडून तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. रोहित यांच्यासमोर माजी खासदार संजयकाका पाटील यांचे आव्हान होते. संजयकाका पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. रोहित पवारांनी त्यांचा 27 हजार 644 मतांनी पराभव करत मोठा विजय मिळवला.