35 मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी पॉवरफूल लढाई! `ही` पाहा यादी
Maharashtra Assembly Election 2024 Sharad Pawar Vs Ajit Pawar: 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांचेही दोन गट पडले आणि मोठा गट अजित पवारांच्या पाठीशी उभा राहिला.
Maharashtra Assembly Election 2024 Sharad Pawar Vs Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपल्यानंतर अनेक मतदारसंघांमधील लढती कशा असतील हे स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असून या माध्यमातून भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीबरोबरच दोन्ही शिवसेना असे सहा पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपात शरद पवार यांनी 87 जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या तर अजित पवार यांच्या पक्षाला महायुतीने केवळ 52 जागाच मिळाल्या आहेत. यापैकी 35 जागांवर थेट अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे.
पक्षात उभी फूट पडल्यानंतर 41 आमदार अजित पवारांबरोबर
2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांपैकी 41 आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला तर उरलेले आमदार शरद पवार यांच्यासोबतच राहिले. फेब्रुवारी 2024 मध्ये निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांच्या गटाला बहाल केले. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत बारामती आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघात शरद पवार यांच्याच पक्षाने बाजी मारत अजित पवारांना धक्का दिला.
नक्की वाचा >> शिवसेना V/s शिवसेना: मुंबईत 'या' 11 ठिकाणी एकमेकांशी भिडणार; 'मातोश्री'च्या अंगणातही शिंदेंकडून चॅलेंज
लक्षवेधी लढती
विधानसभा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी तब्बल 35 जागांवर एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. यंदाच्या निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये अजित पवार विरुध्द युगेंद्र पवार, इंदापूरमध्ये दत्ता भरणे विरुध्द हर्षवर्धन पाटील, कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुध्द समरजीतसिंह घाटगे, कळवा-मुंब्रामध्ये नजीब मुल्ला विरुध्द जितेंद्र आव्हाड यांसारख्या लक्षवेधी लढती होणार आहेत. आता विधानसभेप्रमाणे पुन्हा काका पुतण्याला धक्का देणार की पुतण्या दमदार कमबॅक करणार यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे.
नक्की वाचा >> ठाकरेंच्या 96 उमेदवारांची संपूर्ण यादी एकाच क्लिकवर! तुमच्या मतदारसंघातून उमेदवार कोण पाहा
या जागांवर थेट लढत...
बारामती, इंदापूर, आंबेगाव, अहेरी, कागल, कळवा-मुंब्रा, हडपसर, वसमत, वडगाव शेरी, चिपळुण, शिरुर, तासगाव कवठे महांकाळ, इस्लामपूर, उदगीर, कोपरगाव, अणुशक्ती नगर, येवला, परळी, दिंडोरी, श्रीवर्धन, माजलगाव, वाई, सिन्नर, अहमदनगर शहर, अहमदपूर, शहापूर, पिंपरी, अकोले, जुन्नर, मोहोळ, देवळाली, चंदगड, तुमसर, पुसद, पारनेर