हॉटेलमधून सुटका; `या` अटीवर शिवसेनेच्या आमदारांना घरी जाण्याची परवानगी
Shivsena : खबरदारी म्हणून शिवसेनेच्या सर्व विजयी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. या आमदारांना एका अटीवर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असली तरी विशेष खबरदारी घेण्यात आली. शिवसेना शिंदे पक्षाच्या सर्व विजयी आमदारांना मुंबईतील एका बड्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. या आमदारांची हॉटेलमधून सुटका झाली असून एका अटीवर त्यांना घरी जाण्याची परवानही देण्यात आली आहे.
20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात 288 जागांसाठी मतदान झाले. 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. विधानसभेच्या 288 जागांपैकी तब्बल 227 जागा महायुतीनं जिंकल्या आहेत. भाजपनं सर्वात जास्त 131 जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेनं 55 जागांवर विजय मिळवला आहे. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 41 जागा जिंकल्या आहेत.
शिवसेना शिंदे पक्ष हा महायुतीमधील महत्वाचा घटकपक्ष आहे. यामुळे निकालानंतर शिवसेनेच्या सर्व विजयी आमदारांना मुंबईतील ताजलँड हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या आमदारांची आता हॉटेलमधून सुटका झाली आहे. ज्या आमदारांनी पक्षाकडे एफिडेव्हिट दिले आहेत ते शिंदे गटाचे आमदार परवानगी घेऊन घरी जाऊ शकतात अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
भाजप खासदार नारायण राणे यांनी एकनाथ शिदेंची मुंबईतील ताज लँड एन्ड हॉटेलमध्ये भेट घेतली. त्यांनी एकनाथ शिंदेना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. तसंच निलेश आणि नितेश या दोघांनाही प्रचंड बहुमतानं निवडून दिल्याबद्दल राणेंनी जनतेचे आभार मानले.
शिवसेनेचे संख्याबळ 61 झाल्याचा दावा
शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले मात्र अपक्ष आणि मित्रपक्षांचे आमदारही ताजमध्ये आमच्यासोबत आहे. त्यामुळे आमचं संख्याबळ 61 झालं आहे, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. अशोक माने, राजेंद्र यड्रावकर, शरद सोनावणे, रत्नाकर गुट्टे हे आमच्यासोबत आले आहेत, असं ते म्हणाले. आगामी काळात महापालिका निवडणुका लागतील, त्या महायुती म्हणूनच लढवू, अशी माहिती म्हस्केंनी दिली.