ठाकरेंच्या कठोर निर्णयानंतर `लालबागचा राजा`च्या चरणी सापडलेली `ती` चिठ्ठी पुन्हा चर्चेत
Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray Shivsena: जागावाटपाचा तिढा सुटत आहे त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून उमेदवार जाहीर केले जात असतानाच आता यंदा लालबागच्या राजाच्या चरणी सापडलेली ती चिठ्ठी पुन्हा चर्चेत आली आहे.
Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray Shivsena: विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये मुंबईतील शिवडी मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटलं आहे. चौधरींनी उमेदवारी जाहीर झाल्याने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सोव मंडळाचे सचिव सुधीर साळवी नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगली. त्यानंतर स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांची समजूत घातली. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर रात्री उशीरा आपल्या समर्थकांना संबोधित करताना आपण कायम पक्षाबरोबर राहणार असून पक्षाने दिलेला उमेदवार निवडून देण्यासाठी सर्व ते सहकार्य करु असं साळवी यांनी स्पष्ट केलं आहे. यानंतर अजय चौधरींनी आज म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी विजय साळवींची भेट घेत निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात चर्चा केल्याचे समजते. मात्र या सर्व नाराजी नाट्यादरम्यान यंदाच्या वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी सापडलेली एक चिठ्ठी स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
कथित नाराजी अन् पक्षनिष्ठा
निष्ठावंतांना डावलणार नाही, असं सांगत उद्धव ठाकरेंनी शिवडी विधानसभा मतदारसंघामधून दोन वेळा निवडून आलेले विद्यमान आमदार अजय चौधरी यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. चौधरी आणि साळवी यांच्यापैकी एकाची निवड करण्याचा कठोर निर्णय उद्धव यांना घ्यावा लागला. चौधरींची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघातून लढण्यास उत्सुक असलेले सुधीर साळवी थेट 'मातोश्री'वर ठाकरेंच्या भेटीसाठी गेले होते. त्यांनी सोशल मीडियावरुन आपली नाराजी व्यक्त करणारी पोस्ट करताना 'निष्ठावंत' हा शब्द अधोरेखित केला होता. त्यानंतर लालबागच्या बाजारामध्ये मेळावा घेण्याचे संकेत दिले होते. मात्र या मेळाव्यामध्ये त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसमोर उद्धव ठाकरेंबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं. आपले अजय चौधरींबरोबर कोणतेही मतभेद नसल्याचं म्हटलं आहे. आपण पक्षाबरोबर एकनिष्ठ राहणार असल्याचं साळवींनी स्पष्ट केलं आहे. मात्र या साऱ्या चर्चेदरम्यान चतुर्थीच्या दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी सापडलेली चिठ्ठीही चर्चेत आहे.
नक्की पाहा >> 'मुलगी दिसायला सुंदर असेल तर...'; 'या' विधानामुळे अजित पवारांनी कापलं विद्यमान आमदाराचं तिकीट? पाहा Video
काय घडलेलं चतुर्थीच्या दिवशी?
लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा परतीचा प्रवास अनंत चतुर्थीच्या दिवशी दुपारी 12 च्या सुमारास मंडपातून सुरु झाला. त्या दिवळी पहाटे पासूनच एकीकडे लालबागच्या राजाच्या निरोपाची तयारी सुरु असतानाच अचानक बाप्पाच्या पायावर आणून ठेवलेल्या एका चिठ्ठीने विधासभा निवडणूक जाहीर होण्याआधीच येथील कथित उमेदवारीसंदर्भात राजकीय चर्चांना उधाण आलं. लालबागच्या राजाने निरोप घ्यायच्या दिवशी त्याच्या पायावर आणून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये मात्र सुधीर साळवी यांचं नाव आगामी आमदार म्हणून पाहायला मिळू दे अशी इच्छा अज्ञाताने व्यक्त केली होती. 'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवडी विधानसभा 2024 आमदार सुधीर (भाऊ) साळवी' असा मजकूर या चिठ्ठीत लिहिण्यात आला होता. लालबागच्या राजाच्या पायाशी आपल्या मनातील इच्छा लिहून ठेवली तर ती पूर्ण होते असा भक्तांचा समज आहे. त्यानुसारच ही राजकीय चिठ्ठी राजाच्या पायशी अगदी शेवटच्या दिवशी ठेवण्यात आल्याने येथील स्थानिक राजकारणामध्ये चर्चांना उधाण आलेलं.
नक्की वाचा >> ना महाविकास आघाडी ना महायुती... अबकी बार अपक्ष सरकार? राज्यात 1995 च्या इतिहासाची पुनरावृत्ती?
साळवी नेमके आहेत तरी कोण?
मागील विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर विद्यमान आमदार अजय चौधरी ठाकरेंबरोबर एकनिष्ठ राहिले. त्यामुळेच या मतदारसंघातून तिसऱ्यांदा लढण्यासाठी अजय चौधरी उत्सुक असल्याचं ते आधीपासूनच सांगत होते. मात्र त्याचवेळी ठाकरेंच्या पक्षाकडून सुधीर साळवी देखील शिवडीतून लढण्यासाठी इच्छुक होते. सुधीर साळवी हे स्वत: लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाचे सचिव असल्याने या भागात त्यांचा दबदबा असून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. उद्धव ठाकरेंनी गणेशोत्सवादरम्यान लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं तेव्हा सुधीर साळवीही त्यांच्याबरोबर उपस्थित होते. त्यामुळेच यंदाची उमेदवारी कोणाला दिली जाणार याबद्दल अगदी उमेदवारी जाहीर होईपर्यंत चर्चा होती.
नक्की वाचा >> पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'
सुधीर साळवी लालबागचा राजा मंडळाचे सचिव असण्याबरोबरच उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी शिवडी विधानसभा मतदारसंघात संघटक म्हणून काम पाहतात. तसेच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात समन्वयक म्हणूनही साळवी काम करतात.