Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपात काहीतरी घडतंय का अशी चर्चा सुरु झालीये. उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये राजकीय ब्रेकअप झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाकडून त्यांचा जुना मित्र असलेल्या भाजपला काही सिग्नल दिले जाऊ लागलेत. उद्धव ठाकरे चुकीच्या विचारधारेच्या लोकांसोबत गेल्याचा भाजपचा कायमचा आक्षेप आहे. निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं स्वबळावर निवडणूक लढण्याचा विचार असल्याचं सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालकपदावरुन हटवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी रान उठवलं होतं. त्याच रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालकपदावर पुनःनियुक्ती झाल्यावर शिवसेना आमदार आणि उद्धव ठाकरेंचं खासगी सचिव मिलिंद नार्वेकरांनी अभिनंदन केलं. हे इथपर्यंत थांबलं नाही. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गृहमंत्रिपद त्यांनी स्वतःकडं घ्यावं असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय.


भाजप आणि शिवसेनेत सुप्तसंघर्ष सुरु असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाकडून जुन्या मित्राला सिग्नल तर दिले जात नाही ना अशी चर्चा जोर धरु लागलीय. त्यातच भाजपचे जुनेजाणते नेते रावसाहेब दानवेंनी युतीबाबत मोठं वक्तव्य केलं. उद्धव ठाकरे भाजपसोबत असते तर आणखी मोठं बहुमत सरकारला मिळालं असतं असा अजब तर्क दानवेंनी बोलून दाखवला.


भाजप नेते दानवेंनी केलेलं वेगळंच वक्तव्य शिवसेनेच्या नजरेतून सुटलं नाही. उद्धव ठाकरे भाजपसोबत नाही तरीही भाजप वाढलाय हे रावसाहेब दानवेंनी लक्षात घ्यावं, असा टोला शिवसेनेनं लगावलाय. शिवसेनेची ताकद किती आहे हे सांगण्यासाठी शिरसाटांना दावनेंना एक वेगळी आठवण करुन द्यावी लागली.


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता महाविकास आघाडीसोबत पुढच्या निवडणुका लढवण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. आमदार सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वतंत्र लढण्याबाबत गंभीरपणे विचार सुरु असल्याचं सांगितलं.


मविआपासून उद्धव ठाकरे मनाने लांब-लाब चाललेत. महाविकास आघाडीशी काडीमोड घेतला तर पॅचअप होऊ शकतं अशी काहींना आशा वाटू लागलीय. राजकारणात काहीही शक्य आहे हे गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रानं पाहिलंय. उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून केली जाणारी वक्तव्य भाजपपूरक दिसू लागलीयेत. हा योगायोग आहे की जाणिवपूर्वक काही सिग्नल्स पाठवले जाऊ लागलीयेत याची खुमासदार चर्चा सुरु झालीय.