आदित्य ठाकरेंसमोर आमदारकी टिकवण्याचं आव्हान! शिंदे वरळीत वापरणार `हुकमी एक्का`? मनसेही गॅसवर?
Maharashtra Assembly Election 2024 Worli Assembly Constituency: वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी दुहेरी लढत होईल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता यात तिसऱ्या सेनेनं म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं उडी घेण्याचं ठरवल्याची माहिती समोर येत आहे.
Maharashtra Assembly Election 2024 Worli Assembly Constituency: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख पक्षांनी किमान आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या घटक पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघांमधील लढती कशा असतील हे स्पष्ट झालं आहे. राज्यातील काही मतदारसंघांमधील लढती या प्रतिष्ठेचा मुद्दा ठरणार आहेत. अशाच एका मतदारसंघापैकी एक म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आमदार पुत्रांचा अर्थात आदित्य ठाकरेंचा वरळी हा मतदारसंघ! आदित्य ठाकरे हे वरळीमधून दुसऱ्यांदा निवडणूक लढणार असल्याचं पक्षाच्या पहिल्या उमेदवार यादीनंतर स्पष्ट झालं आहे. असं असतानाच वरळीमधून राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं संदीप देशपांडेंना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंसमोरील आव्हान कडवं असणार हे स्पष्ट झालं आहे. असं असतानाच आता या दुहेरी लढाईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आपल्या पक्षाचा उमेदवार उतरवण्यासाठी जोरदार तयारी करत असून त्यांनी आपला हुकुमी एक्का इथे वापरण्याची चाचपणी सुरु केली आहे. खरोखरच असं झालं तर ही लढाई ठाकरेंसाठी फारच कठीण ठरेल असा प्रथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शिंदेंचा हा हुकुमी एक्का आहे तरी कोण आणि त्यांचा काय प्लॅन आहे पाहूयात...
दुहेरी लढाईची चर्चा
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामधून 2019 मध्ये ठाकरेंच्या कुटुंबातील सदस्य पहिल्यांदाच लढत असल्याने मनसेनं उमेदवार दिला नव्हता. मात्र यंदा चित्र पूर्णपणे वेगळं असून मनसेनं या ठिकाणी संदीप देशपांडेंना उमेदवारी दिली आहे. संदीप देशपांडे हे आदित्य ठाकरेंसमोर आव्हान निर्माण करतील असं मनसे नेतृत्वाचं म्हणणं असून त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज ठाकरेंच्या हस्ते विधानसभेसाठीच्या मनसेच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळीही राज यांनी वरळीमधून लढण्यासाठी संदीप देशपांडेंना विशेष शुभेच्छा दिल्या. संदीप देशपांडेंनी ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढत असून घरोघरी जाऊन लोकांसमोर प्रश्न मांडत असल्याचं सांगितलं. आपण आदित्य ठाकरेंना कठोर आव्हान देऊन असा विश्वास संदीप देशपांडेंनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आधीपासूनच या मतदारसंघाकडे मराठी मतदारांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या मतदारसंघामध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामाना होत असून कोण बाजी मारणार याबद्दल उत्सुकता आहे.
नक्की वाचा >> Good News... नोव्हेंबरमध्ये 'या' दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला अतिरिक्त सुट्टी जाहीर! राज्य सरकारचा आदेश
शिंदेंची उडी? हा उमेदवार देणार?
अडीच वर्षांपूर्वी पक्ष नेतृत्वाविरुद्ध बंडखोरी करत भाजपाबरोबर सरकार स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. वरळीमधून निवडणूक लढवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं गांभीर्याने तयारी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मजबूत उमेदवार देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रयत्न सुरू केले असून मागील काही दिवसांपासून उमेदवाराची चाचपणी सुरु आहे. अशातच आता एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाचे खासदार मिलिंद देवरा यांच्या नावाचाही विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. मिलिंद देवरा हे आदित्य ठाकरेंसमोर मोठं आव्हान उभं करु शकतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील एक ते दोन दिवसांमध्ये वरळी विधानसभेतून कोण लढणार या नावावर मुख्यमंत्री शिंदेंकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरोखरच मिलिंद देवरांना उमेदवारी मिळाली तर मनसेसमोरही या ठिकाणी लढणं अधिक कठीण होऊ शकतं. मिलिंद देवरांची कारकिर्द पाहिल्यास त्यांना पसंती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नक्की वाचा >> पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'
दमदार राजकीय पार्श्वभूमी
याच वर्षी जानेवारी महिन्यात मिलिंद देवरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मिलिंद देवरा हे मागील काही दशकांपासून मुंबईतील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एख होते. काँग्रेसला आर्थिक राजधानीमधून पक्षनिधी मिळवून देण्यात देवरांचा विशेष हातखंड होता. मात्र 2014 पासून त्यांचे राहुल गांधींबरोबरचे संबंध बिघडत गेले. आपलं खच्चीकरण केलं जात असल्याची भावना देवरा आणि त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली. त्यामुळेच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात होताच मिलिंद देवरांनी काँग्रेस सोडली. मिलिंद देवरांचा जन्म 4 डिसेंबर 1976 चा आहे.
नक्की वाचा >> ठाकरेंची घाई महाविकास आघाडीला संकटात नेई? 'त्या' 12 जागांमुळे गोंधळ; मित्रपक्षांशी चर्चा न करताच...
काँग्रेसचे दिग्गज नेते दिवंगत मुरली देवरांचे ते पुत्र आहेत. बोस्टन युनिव्हर्सिटीमधून देवरांनी शिक्षण पूर्ण केलं असून ते 14 व्या लोकसभेतील सर्वात तरुण खासदार होते. त्यांना युपीए-2 च्या काळात माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली. 2012 ते 2014 दरम्यान ते देशाचे जहाज बांधणी राज्यमंत्री होते.
नक्की वाचा >> अजित पवारांची दुसरी यादी: RR पाटलांच्या लेकाविरुद्ध दिला उमेदवार; झिशान सिद्दीकी, सना मलिकला संधी
2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसविरोधी लाटेत मिलिंद देवरांना शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये 1 लाख 20 हजार मतांनी पराभव केलं. नंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 1 लाख मतांनी मिलिंद देवरा यांचा पराभव झाला. या पराभवामध्ये मिलिंद देवरांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुंबई काँग्रेस गटबाजीने ग्रासलेल्याने अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी पक्ष सोडला.