राज्यात एकूण २६९ ठिकाणी मतमोजणी, दहा हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती
महाराष्ट्राच्या विधानसभेवर कोणचा झेंडा फडकणार ?
मुंबई : निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची जय्यत तयारी केली आहे. राज्यात एकूण २६९ ठिकाणी मतमोजणी होणार आहे. मतदानासाठी जवळपास दहा हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीय. राज्यात सगळीकडं सकाळी आठ वाजता एकाचवेळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतदारसंघातल्या पाच व्हिव्हिपॅटच्या चिठ्ठ्यांची मोजणी केली जाणार आहे. सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेटची मोजणी होईल त्यानंतर टपाली मतं मोजली जातील. आणि शेवटी ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरावर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. शिवाय केंद्रीय सशस्त्र सुरक्षा बल, राज्य राखीव पोलीस दल आणि पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा या ठिकाणी असणार आहे.
मुंबईमध्ये एकूण १० ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस सज्ज आहेत. ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅटच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेण्यात येते आहे.
नागपुरातही मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी दिक्षाभूमीजवळच्या मुंडले इंग्लिश मीडियम स्कूल परिसरात होणार आहे. तिथं मतमोजणीच्या 27 फेऱ्या होणार आहे. पहिल्या पाऊण ते एक तासात पहिला कल हाती येण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयातील ८ विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालंय. सर्वात जास्त चर्चा आहे ती तळ कोकणातील. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री दीपक केसरकर यांना बंडखोर राजन तेली यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून आव्हान दिलंय. तर रत्नागिरीमधील पाच विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे यामध्ये दापोली आणि चिपळूणमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळते.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातसुद्धा मतमोजणीची तयारी पूर्ण झालीय. गोंदियात अर्जुनी-मोरगाव, तिरोडा, गोंदिया, आणि आमगाव या चार मतदारसंघासाठी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी २३३ अधिकारी-कर्मचारी हजर राहणार असून यामध्ये राखीव कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तर भंडारा जिल्ह्यातील तुमसर, साकोली आणि भंडारा मतदारसंघासाठी मतमोजणी होणार आहे.
रायगड जिल्हयात मतमोजणीची तयारी निवडणूक आयोगाकडून पूर्ण झाली आहे. जिल्हयातील सात विधानसभा मतदार संघातील मतमोजणी वेगवेगळया ठिकाणी होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी याची सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रापासून 100 मीटर परीसरात कोणतेही वाहन किंवा अनधिकृत व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही . कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आली आहे.
अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम मतदारसंघाची मतमोजणी अकोल्यातील खदान परिसरातील शासकीय गोदामात करण्यात येणार आहे. अकोट मतदार संघाची मतमोजणी पोपटखेड मार्गावरील आयटीआय येथे होणार आहे. मूर्तिजापूर मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालयावर करण्यात येणार असून बाळापूर मतदारसंघाची मतमोजणी शासकीय गोदामात करण्यात येणार आहे. पाचही मतदार संघात होणाऱ्या मतमोजणीला जय्यत तयारी करण्यात आली असून चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
ठाणे जिल्हयातील १८ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी १८ मतमोजणी केंद्रावर होणार असून निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी सुसज्ज आहे. मतमोजणीच्या कामासाठी जवळपास ७००० कर्मचारी/अधिकारी नेमण्यात आले असून त्यांच्यामार्फत अत्यंत पारदर्शीपणाने व अचूकतेने मतमोजणी पूर्ण करण्यात येणार असून मतमोजणी ठीक सकाळी ८ वाजता सुरू केली जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी १४ टेबल निहाय आराखडा तयार करण्यात आलेला आहे. पहिल्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर, दुसरी फेरीची मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने जवळपास नऊ हजार पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणीच्या ठिकणी दोन अधिकारी आणि पोलिसांची एक टीम असणार आहे. त्याच बरोबर cctv ची नजर ही या प्रक्रियेवर असणार आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या सातारा लोकसभा पोट निवडणुकीच्या निकालासाठी लोकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्यात जरी उद्या दुपार पर्यंत विधानसभेचे निकाल स्पष्ट होणार असले तरी साताऱ्यातील लोकसभा आणि 6 विधानसभेची मतमोजणी एकाच वेळी होणार असल्याने निकालाला वेळ लागणार आहे. राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांच्यात ही प्रमुख होत असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.