आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना खोचक सवाल! म्हणाले, `महायुतीत मनसेला...`
Aaditya Thackeray Slams MNS Chief Raj Thackeray: राज ठाकरेंनी शिवसेना पक्षाबद्दल केलेल्या विधानावरुन आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी खोचक शब्दांमध्ये मनसे अध्यक्षांवर निशाणा साधला.
Aaditya Thackeray Slams MNS Chief Raj Thackeray: महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेमध्ये पडलेली फूट आणि पक्षचिन्ह तसेच नावावरुन झालेला वाद हा प्रचारामध्ये चर्चेचा मुद्दा ठरत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील जाहीर सभेमध्ये धनुष्यबाण आणि शिवसेना हा ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी असल्याचं विधान केलं. त्यानंतर यावर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया नोंदवल्या जात असतानाच आता राज यांचे पुतणे तसेच वरळी विधानसभेतील उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
राज ठाकरेंच्या विधानावरुन विचारला प्रश्न; आदित्य म्हणाले, 'कधीही वैयक्तिक...'
महाविकास आघाडीच्या वडाळा विधानसभेच्या अधिकृत उमेदवार श्रद्धा जाधव यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मुंबईमध्ये मंगळवारी रोड शोमध्ये सहभागी झाले. या रोड शोनंतर आदित्य ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. त्यावेळेस त्यांना राज ठाकरेंनी केलेल्या विधानावरुन प्रश्न विचारण्यात आला. "धनुष्यबाण उद्धव ठाकरेंचा नाही किंवा मुख्यमंत्र्यांचा नाही. धनुष्यबाण बाळासाहेबांचा आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत," असं म्हणत आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. त्यावर आदित्य ठाकरेंनी, "मला एक महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की मी कधी त्यांच्यावर वैयक्तिक बोलत नाही, पण जेव्हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (हयात) असताना जेव्हा आमचा अख्खा पक्ष फोडून दुसरा पक्ष बनवल्याने त्यांना किती दु:ख झालं असेल याचा विचार करा," अशी प्रतिक्रिया नोंदवली.
महायुतीत एकसुद्धा जागा...
पुढे बोलताना आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंच्या पक्षावर निशाणा साधला. "दुसरी गोष्ट म्हणजे 20 वर्षात आम्ही कधीही बोललो नाही त्यांच्यावर. आम्ही मर्यादा पाळलेल्या आहेत. पण ज्या भाजपाने महाराष्ट्राला लुटण्यात मदत केली, मराठी माणसाचे रोजगार आणि उद्योग गुजरातला नेऊन ठेवले अशा भाजपाचे मुख्यमंत्री आम्ही बसू देऊ शकत नाही. दुसरे स्वत: कोणी बोलत असतील की भाजपाचे मुख्यमंत्री बनवायचे आहेत. तर त्यांना महायुतीत एकसुद्धा जागा का नाही मिळाली? हा त्यांनी विचार करावा," असा टोला आदित्य ठाकरेंनी काकांच्या पक्षाबद्दल बोलताना लगावला.
नक्की वाचा >> 'मुंब्र्यात शिवरायांचं मंदिर उभारा'वरुन राडा! राऊत फडणवीसांवर संतापून म्हणाले, 'देशातील मुस्लिमांचा...'
राज यांच्या त्या विधानावरुन निशाणा
राज ठाकरेंनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपाचा असेल असं मत नोंदवलं होतं. तसेच हा मुख्यमंत्री आमच्या सहकार्याने असेल असंही राज म्हणाले. त्यावरुनच आदित्य ठाकरेंनी भाजपाचा मुख्यमंत्री व्हावं असं म्हणणाऱ्या मनसेला महायुतीने एकही जागा का दिली नाही, असा शाब्दिक चिमटा काढला आहे.