कोकण दौरा सुरु करण्याआधीच ठाकरेंकडून CM शिंदेंना मोठा धक्का! भाजपालाही बसणार फटका?
Maharashtra Assembly Election Big Blow To CM Eknath Shinde Shivsena: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या पक्षाने कोकणामधील जाहीर सभेच्या आधीच मोठा दणका दिला आहे. नेमकं घडलं काय...
Maharashtra Assembly Election Big Blow To CM Eknath Shinde Shivsena: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यानिमित्त पहिली सभा घेण्याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. कोकणातील नारायण राणेंचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्गमधील एक बडा नेता ठाकरेंच्या पक्षाच्या गळाला लागला आहे. विशेष म्हणजे ठाकरेंच्या आजच्या दौऱ्या आधीच माजी केंद्रीय मंत्री तसेच विद्यमान खासदार नारायण राणेंनी त्यांना अपशब्द बोलण्यावरुन इशारा देताना रोडने जाऊन दाखवावे असं म्हटलं होतं. मात्र कोकणात दाखल होण्याआधीच ठाकरेंनी शिंदेंबरोबरच राणेंना मोठा धक्का दिला आहे.
नेमकं घडलं काय?
शिवसेना शिंदे गटाला सिंधुदुर्गात धक्का.माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत ठाकरे सेनेत करणार प्रवेश.उद्धव ठाकरे यांच्या सावंतवाडी येथील जाहीर सभेत पक्षप्रवेश होणार आहे. ब्रिगेडियर सावंत हे काँग्रेसमधून खासदार होते. त्यांनतर त्यांनी स्वतःचा स्वराज पक्ष काढला होता. नंतर ते आम आदमी पार्टीत सामील झाले होते. शिवसेनेमध्ये फूट पडून शिंदेंचा पक्ष आणि ठाकरेंचा पक्ष अशी फूट पडल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंची साथ देत त्यांच्या पक्षात प्रवेश केला होता. आज ते शिंदेंची साथ सोडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ब्रिगेडियर सावंत यांच्या पक्षप्रवेशाने ठाकरेंच्या शिवसेनेला निवडणुकीआधी सिंधुदुर्गमध्ये बळ मिळणार आहे. ब्रिगेडियर सावंत हे स्थानिक नेतृत्वांपैकी महत्त्वाचं नाव असल्याने शिंदेंचा पक्ष सोडल्याने याचा काही प्रमाणात भाजपाच्या मतांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आज ठाकरेंचा कोकण दौरा
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे आज कोकणात तीन सभा घेणार आहेत. यामध्ये कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथे सभा होत असून या दौऱ्यामुळे ठाकरे विरुद्ध राणे वादाचा पुढला अंक लिहिला जाईल अशी जोरदार चर्चा कोकणात सुरु आहे. कणकवली आणि कुडाळ येथे नितेश राणे आणि निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोघांविरुद्ध कोकणात ठाकरेंनी उमेदवार दिले असून त्यांच्या प्रचारासाठीच ते आज दौरा करत आहेत.
नक्की वाचा >> '...तर बाय रोड जाऊन दाखव!'; उद्धव ठाकरेंनी कोकणात पाऊल ठेवण्याआधीच नारायण राणेंचा इशारा
कोकणातील या तिन्ही मतदारसंघात अशा होणार लढती
कणकवलीमध्ये नितेश राणे विरुद्ध संदेश पारकर अशी लढत रंगणार आहे. कुडाळ मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या पक्षाचे वैभव नाईक विरुद्ध एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश करणारे निलेश राणे अशी लढत होत आहे. सावंतवाडीमध्ये विद्यमान मंत्री आणि एकनाथ शिंदे गटाचे दिपक केसरकर यांच्याविरुद्ध उद्धव ठाकरेंनी राजन तेलींनी उमेदवारी दिली आहे.