Uddhav Thackeray Rally In Konkan Narayan Rane Reacts: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे आज कोकणात तीन सभा घेणार आहेत. यामध्ये कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथे सभा होत असून या दौऱ्यामुळे ठाकरे विरुद्ध राणे वादाचा पुढला अंक लिहिला जाईल अशी जोरदार चर्चा कोकणात सुरु आहे. कणकवली आणि कुडाळ येथे नितेश राणे आणि निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोघांविरुद्ध कोकणात ठाकरेंनी उमेदवार दिले असून त्यांच्या प्रचारासाठीच ते आज दौरा करत आहेत. मात्र या दौऱ्यापूर्वीच खासदार नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना 'जर-तर'च्या भाषेत इशारा दिला आहे. त्यामुळेच राणेंबद्दल उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या सभेसंदर्भात काही दिवसांपूर्वी नारायण राणेंना पत्रकारांनीप्रश्न विचारला. 'तुमच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत 13 तारखेला', असं म्हणत पत्रकारांनी नारायण राणेंना प्रश्न विचारला होता. त्यावर नारायण राणेंनी, "माझी सभा मग साडेतेरा तारखेला असणार. माझी सभा असणार 100 टक्के," असं उत्तर दिलं होतं. "त्यांची झाली की माझी (सभा) असणार. अपशब्द बोलला ना तर म्हणाव एकच रस्ता आहे. हेलिकॉप्टरने जाऊ नको, बाय रोड जाऊन दाखव," असं थेट आव्हानच नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना या बहुचर्चित सभेपूर्वी दिलं आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या आजच्या सभेदरम्यान काही गोंधळ होणार का याबद्दलची चर्चा दबक्या आवाजात कोकणात सुरु आहे. दुसरीकडे ठाकरेंच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या सभेसाठी जोरदार तयारी केली आहे.
असं असतानाच दुसरीकडे ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार वैभव नाईक यांनी थेट राणेंना आव्हान दिलं आहे. "तुमचं वय झालं आहे. तुम्ही उगाच धमक्या देऊ नका. उद्धवजींना आडवण्याआधी आम्हाला फेस करावं लागेल. मग बघूया कोण कोणाला आडवतंय. नारायण राणे कितीही बोलले तरी ते आडवू शकत नाही. आम्ही आधीच सांगून ठेवलं आहे की पहिली गाडी आमची असेल. उद्धव ठाकरेंच्या सभेला हजारो सिंधुदुर्गवासी हजेरी लावून त्यांचे विचार ऐकतील. या मतदारसंघांमध्ये उद्धवजींच्या शिवसेनेचे तिन्ही उमेदवार निवडून येतील," असा विश्वास वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे.
नक्की वाचा >> 'बॅग तपासली तर एवढा काय फरक पडला? अरे माझी बॅग...'; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कणकवलीमध्ये नितेश राणे विरुद्ध संदेश पारकर अशी लढत रंगणार आहे.
कुडाळ मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या पक्षाचे वैभव नाईक विरुद्ध एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश करणारे निलेश राणे अशी लढत होत आहे.
सावंतवाडीमध्ये विद्यमान मंत्री आणि एकनाथ शिंदे गटाचे दिपक केसरकर यांच्याविरुद्ध उद्धव ठाकरेंनी राजन तेलींनी उमेदवारी दिली आहे.