Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वादळ? एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, संजय शिरसाट स्पष्टच बोलले
Eknath Shinde At Dare Village Satara : पुन्हा एकदा तेच गाव, तेच एकनाथ शिंदे आणि तेच राजकारण... मोठा निर्णय म्हणजे नेमकं काय? शिंदेंच्या परतण्याकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष
Eknath Shinde At Dare Village Satara : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सातत्यानं काही मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरीही अद्याप मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याची अधिकृत घोषणा झालेली नाही. सत्तास्थापनेआधी खातेवाटपावरून होणारं राजकारणही आता लपून राहिलेलं नाही. त्यातच आता मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या संभाव्य तारखा समोर आलेल्या असतानाच राज्याच्या राजकारणात आणखी एका वादळाचे संकेत मिळत आहेत.
राजकीय वादळाचे संकेत, एकनाथ शिंदे...
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या महाबळेश्वर तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी दरे गावात मुक्कामी आहेत. दोन दिवस एकनाथ शिंदे दरे गावात राहणार असून, शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत तिथं ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याची माहिती आहे. राज्यभरामध्ये मंत्रिमंडळ त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र शिंदे दरेगावात गेल्याने राजकीय चर्चांना मोठ्या प्रमाणात उधान आलं आहे.
साताऱ्यातील गावात एकनाथ शिंदे विश्रामासाठी गेले असले तरीही तिथून परत आल्यानंतर ते मोठा आणि चांगला निर्णय घेतील असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे. 'दोन दिवसाच्या सुट्टीवरुन एकनाथ शिंदे जेव्हा येतात, तेव्हा मोठा आणि चांगला निर्णय जाहीर करतील' असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं.
हेसुद्धा वाचा : मागण्या, विरोध, एकमत...! दिल्लीतल्या बैठकीत नेमकं काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
'एकनाथ शिंदे साहेब असे आहेत की, जेव्हाजेव्हा राजकीय पेचप्रसंग येतात तेव्हातेव्हा विचार करायचा असेल तर त्यांना गावचं ठिकाण आवडतं. म्हणून ते एखाद दोन दिवस गावाकडे जातात. थोडं राजकारणापासून दूर... आणि त्यांच्या पद्धतीनं निर्णय घेण्याची क्षमता त्यांना त्यांच्या दरे गावातून मिळते असं मला त्य़ांच्यासोबत वावरचताना लक्षात आलंय', असं शिरसाट म्हणाले.
गावात गेल्यावर एकनाथ शिंदेंचा मोबाईलही बंद असतो, तिथं ते अतिशय शांतपणे मोठा आणि चांगला निर्णय घेतात असं आश्वासक वक्तव्य शिरसाट यांनी केलं. तेव्हा आता शिंदे खरंच एखादा मोठा निर्णय घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.