Maharashtra Assembly Election: 21 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार; कोणते आहेत `ते` जिल्हे? वाचा संपूर्ण यादी
महाराष्ट्रातल्या तब्बल 21 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झालीय. 21 जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला चांगलं यश मिळालं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीला मोठ्या आत्मविश्वासाने काँग्रेस सामोरे गेली. मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला. महाराष्ट्रातल्या तब्बल 21 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झालीय. 21 जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही. पाहुयात, यावरील एक रिपोर्ट.
विधानसभा निवडणुकीत महायुतीनं प्रचंड मोठा विजय मिळवत मविआला धक्का दिला आहे. काँग्रेससह ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मविआत सर्वाधिक जागा लढवलेल्या काँग्रेसनं केवळ 16 जागांवर विजय मिळवता आला. लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केलेल्या काँग्रेसचा विधानसभेत दारूण पराभव झाला आहे. महाराष्ट्रातील तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये काँग्रेसची पाटी कोरी राहिली आहे.
'21 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार
-धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, वर्धा,
- गोंदिया, नांदेड, हिंगोली, परभणी, संभाजीनगर
- नाशिक, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
- रायगड, पुणे, बीड, सोलापूर
- सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही
पुणे, सोलापूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा मोठा जनाधार आहे. पुणे जिल्ह्यात काँग्रेसला खातंही उघडता आलेलं नाही. सोलापूर जिल्ह्यातही काँगेसची पाटी कोरी राहिली. अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरानंतर नांदेडमध्ये काँग्रेसला फटका बसला आहे. राज्यात एकेकाळी 200 पेक्षा जास्त आमदार निवडून येणाऱ्या आणि लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक खासदार निवडून आलेल्या काँग्रेसचा विधानसभेला मोठा पराभव झाला. पृथ्वीराज चव्हाण,बाळासाहेब थोरात,नसिम खान, यशोमती ठाकूर अशा अनेक काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांचा पराभव झाला. 6 महिन्यांपूवी लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक 13 खासदार काँग्रेसचे निवडून आले होते. यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र पक्षाची निचांकी कामगिरी झाली.
1970, 1980 च्या दशकात काँग्रेसचे राज्य विधानसभेत 200 पेक्षा अधिक आमदार निवडून येत असत. काँग्रेसची घट्ट पकड होती, पण हळूहळू काँग्रेसची ताकद कमी होत गेली. पुणे, सोलापूर, नांदेड या जिल्ह्यांत काँग्रेसला नेहमी यश मिळायचं मात्र यंदा या महत्त्वाच्या जिल्ह्यात अपयशच पदरी आलं. स्वातंत्र्यापासून सर्वात मोठा आणि महाराष्ट्रातील तळागाळात पोहोचलेल्या काँग्रेसची या विधानसभेत मोठी वाताहत झाली आहे.