Mahayuti Oath Ceremony : महाराष्ट्रातील राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी अपडेट झी २४ तासला महायुतीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. महायुतीचा येत्या गुरुवारी 5 डिसेंबरला मुंबईत आझाद मैदानात संध्याकाळी 5 वाजता भव्य शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. महायुतीमधील खातवाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही, म्हणून इतर मंत्र्यांच्या शपथविधीचा निर्णय अजून झालेला नाही. तूर्तास तिघांच्या शपथविधीला दिल्लीकडून ग्रीन सिग्नल मिळला आहे, असं सूत्रांनी सांगितलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस उलटून गेले तरीदेखील अजून महायुतीत खातेवाटचा निर्णय झालेला नाहीय. सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असताना अचानक काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावाला निघून गेले. त्यानंतर रविवारी गावाहून परतल्यावर त्यांची प्रकृती खराब झाली. अशात सोमवारी रात्री भाजपचे संकटमोचक गिरीष महाजन त्यांच्या भेटीसाठी ठाण्याला त्यांच्या निवासस्थानी गेले. त्यानंतर मंगळवारी सकाळी एकनाथ शिंदे ज्यूपिटरला गेले तिथे चेकअपनंतर ते वर्षा बंगल्यावर परतले. त्यानंतर भेटीगाठीचं सत्र सुरु झालं. रात्री अचानक देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी आले. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत काही आलबेल नाही, अशी चर्चा रंगली होती, त्याला अजून हवा मिळाली. 


खरं तर गृहमंत्रीपदावरून शिवसेना आग्रही आहे. उपमुख्यमंत्रीकडेच गृहमंत्रीपद असतं, हे असं म्हणतं शिवसेना गृहमंत्रीपदावर ठाम आहे. तरदुसरीकडे भाजप गृहमंत्रीपद सोडण्यास तयार नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागलंय. अशातच आता एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी अस्वस्थ असल्याचं म्हटलं जात आहे. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या आहेत. त्यात सरकार स्थापन होत नसल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता दिसून येत आहे. महायुतीकडे बहुमत असल्यानं किमान दोन पक्षांसह मंत्रिमंडळाचा शपथविधी उरकून घ्यावा या मागणीसाठी अजित पवारांनी दिल्ली गाठलीये.


महायुतीत ज्याचे जास्त आमदार त्याला जास्त मंत्रिपदं असा फॉर्म्युला असल्याचं सांगण्यात येतंय. पण राष्ट्रवादीला हा फॉर्म्युला मान्य नाही. राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट भाजप खालोखाल असल्यानं शिवसेनेऐवढीच मंत्रिपदं राष्ट्रवादीनं मागितलीयेत. या मागणीनं शिवसेना अस्वस्थ झालीये. शपथविधीच्या तोंडावर राष्ट्रवादीनं नवा फॉर्म्युला आणल्यानं शिवसेना नाराज झालीये. त्यामुळे खातेवाटपाचा निर्णय न झाल्यामुळे गुरुवारी 5 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतली असं सूत्रांनी सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेंसह अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. 


शपथविधी सोहळ्यासाठी कोण कोण येणार? 


- उद्धव ठाकरे, शरद पवारांसह सर्व बड्या नेत्यांना प्रशासकिय निमंत्रण 
- सर्व माजी मुख्यमंत्री यांना निमंत्रण जाणार 
- केंद्रातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी 
- मराठी कलाकार 
- मुंबई, महाराष्ट्रातील प्रमुख पदांवरील व्यक्ती 
- अंबानींसह सर्व बडे उद्योगपती 
- सीए, डॉक्टर आणि सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठीत 
- 100 हून अधिक संत-महंत 
- बॉलीवूड, मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार 
- 10 हजार लाडक्या बहिणी
- अजय-अतुल, कैलास खेर यांचे सांस्कृतिक कार्यक्रम 
- 'जो राम को लाये है हम उनको लायेंगे' या गाण्याचे गायक कन्हैय्या मित्तल