`बॅग तपासली तर एवढा काय फरक पडला? अरे माझी बॅग...`; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Maharashtra Assembly Election Fadnavis Slams Uddhav Thackeray: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बॅगांची सलग दोन दिवस तपासणी करण्यात आली. यावरुनच आता राजकीय वातावरण तापलेलं असतानाच फडणवीसांना त्यांना टोला लगावला आहे.
Maharashtra Assembly Election Fadnavis Slams Uddhav Thackeray: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बॅगांची मागील दोन दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. स्वत: उद्धव ठाकरे यांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे. आपल्या जाहीर भाषणांमधून उद्धव ठाकरेंनी बॅग तपासण्यास आपली हरकत नाही मात्र सत्ताधारी नेत्यांच्या बॅगा का तपासल्या जात नाहीत? असा सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान या बॅग तपासणी वादावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंपाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
नेमकं घडलं काय?
उद्धव ठाकरेंची बॅग सोमवारी यवतमाळमध्ये हेलिपॅडवर तपासण्यात आली. त्यानंतर मंगळवारी उद्धव ठाकरेंची बॅग लातूरच्या औसा येथील हेलिपॅडवर तपासण्यात आली. यावर उद्धव ठाकरेंनी जाहीर भाषणामधून आक्षेप नोंदवत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगा तपासणार का? असा सवाल निवडणूक आयोगाला केला. आता याच मुद्द्यावरुन मंगळवारी रात्री कल्याण पूर्व मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेतून देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. सर्व मुद्दे संपल्याने आता रडारड करुन मतं मागितली जात असल्याचं फडणवीस यांनी ठाकरेंना टोला लगावताना म्हटलं आहे. एवढ्यावरच न थांबता आपलीही बॅग तपासण्यात आली होती पण आपण कधी त्याचा इश्यू केला नाही, असं फडणवीस म्हणाले.
फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
फडणवीस यांनी जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत बॅग प्रकरणावरुन टोला लगावला. "आता इलेक्शन कमिशन कुठेही आम्ही गेलो तर आमच्या बॅगा तपासतात. आमच्यासोबतच्यांच्या बॅगा तपासतात. आता बॅगा तपासल्या तर काय झालं? त्याचा एवढा इश्यू करण्याचं कारण काय? पण दोन दिवस झाले उद्धवजी माझी बॅग तपासली, माझी बॅग तपासली करत आहेत. अरे होतं काय घबाड? एवढं काय घाबरताय? बॅग तपासली तर एवढा काय फरक पडला? अरे माझी बॅग तपासली ना! नांदेडच्या एअरपोर्टवर तपासली, कोल्हापूरच्या एअरपोर्टवर तपासली. आम्ही नाही त्याचा इश्यू केला. बॅग तपासतात, बॅग तपासतात असं म्हणत आम्ही नाही त्या ठिकाणी रडारड केली. यांच्या जवळचे सगळे विषय संपलेले आहेत. आता रडारड करण्याची वेळ आली आहे. रडारड करुन मतं मागण्याचं काम हे लोक करत आहेत," असं फडणवीस म्हणाले.
नक्की वाचा >> 370 कलम, ‘बटेंगे, कटेंगे’पेक्षा मोदींनी महाराष्ट्राला हे सांगावे की...; ठाकरेंची मागणी
राज ठाकरेंनीही साधला निशाणा
राज ठाकरेंनीही भांडुपमधील जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंवर बॅग प्रकरणावरुन टीका केली. "आज, परवा उद्दव ठाकरेंची बॅग तपासली. निवडणूक आयोगाच्या लोकांनाही काय कुठे तपासायचं हे पण कळत नाही. ज्याच्या हातातून कधी पैसे बाहेर आले नाहीत, त्याच्या बॅगेत काय सापडणार? जास्तीत जास्त हातरुमाल आणि कोमट पाणी. कशासाठी बॅग तपासत आहात? त्याचं केवढं औडंबर, आमच्याही बॅगा तपासल्या आहेत. त्यांचं काम ते करत असतात. जुहू विमानतळावर जाताना दोन-तीनदा आमच्याही बॅगा तपासतात, ते नेहमीचं आहे," असं राज ठाकरे म्हणाले.
गडकरींच्या बॅगेचीही तपासणी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही बॅगची निवडणूक विभागाच्या पथकाने मंगळवारी तपासणी केल्याची माहिती समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी येथे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ गडकरी हे मंगळवारी हेलिकॉप्टरने किल्लारी येथे आले असता त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली.