...अन् सतेज पाटील कार्यकर्त्यांसमोर ढसाढसा रडले! कोल्हापूरमधील राड्यानंतरचा Video पाहाच
Maharashtra Assembly Election: उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अर्ध्या तासाहून कमी वेळ शिल्लक असताना अचानक महाविकास आघाडीच्या कोल्हापूर उत्तरमधील उमेदवाराने माघार घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात बाचाबाची झाली.
Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शेवटचे काही मिनिटं शिल्लक राहिले असताना अभुतपूर्व ड्रामा पाहायला मिळाला. अर्ज मागे घेण्याची आज दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत असतानाच अचानक या ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मधुरीमाराजे (Madhurima Raje) यांनी माघार घेतली. मधुरीमाराजे यांच्या उमेदवारीवरुन घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सतेज पाटील यांना कार्यकर्त्यांशी बोलताना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
नक्की घडलं काय?
पक्षातील वरिष्ठांनी आधी उमेदवारी जाहीर केलेल्या राजेश लाटकर (Rajesh Latkar) यांची उमेदवारी रद्द करून मधुरीमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतली आणि या अत्यंत महत्त्वाच्या मतदारसंघात नाचक्की झाली. त्यामुळे सतेज पाटील (Satej Patil) चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. मधुरीमाराजे यांना काँग्रेसकडून एबी फॉर्म देण्यात आला होता. यानंतर त्यांनी अर्ज देखील दाखल केला होता मात्र अगदी तो शेवटच्या क्षणी मागे घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खासदार शाहू छत्रपती यांच्या समोर सतेज पाटील यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त करुन दाखवली. मधुरीमाराजे यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने सतेज पाटील मात्र चांगलेच संतापलेले पहायला मिळालं. "दम नव्हता तर उमेदवारी कशाला घेतली?" अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. "जर लढायचे नव्हते तर उमेदवारी घ्यायलाच नको होती. मी माझी ताकद दाखवली असती," अशा शब्दांत त्यांनी नाराजी बोलून दाखवली.
शाहू छत्रतींना बोलून दाखवली नाराजी
अर्ज मागे घेऊन मधुरीमाराजे गेल्यानंतर दरवाजातच सतेज पाटील यांनी शाहू छत्रपती यांच्या समोरच, "हे पूर्णपणे माझी फसवणूक केल्यासारखं आहे. हे नाही चालणार. मग आधीच नाही म्हणून निर्णय घ्यायला हवा होता. मला काही अडचण नव्हती. हे चुकीचं आहे महाराज. हे मला काही मान्य नाही. मला तोंडघशी पाडण्याची गरज नव्हती," असं म्हणत नाराजी व्यक्त केली. तसेच शाहूंच्या समर्थकांना सतेज पाटलांनी, "हे अजिबात बरोबर नाही, तुम्ही जेवढ्यांनी आग लावली त्या सर्वांना सांगत आहे," असं म्हणत संताप व्यक्त केला.
कार्यकर्त्यांसमोर ठसाठसा रडले
साऱ्या गोंधळानंतर सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अजिंक्यतारा येथील कार्यालयासमोर सतेज पाटलांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळेस कार्यकर्त्यांशी बोलताना सतेज पाटील यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो, मला काही माहीत नाही. जे काय झालं ते तुमच्या समोर आहे," असं म्हणत भाषणाला सुरुवात केल्यानंतर सतेज पाटील यांचा कंठ दाटून आला. त्यानंतर त्यांनी माईक खाली ठेवत ते खाली बसले आणि डोळे पुसू लागले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी 'सतेज पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर एका पदाधिकाऱ्याने उठून कार्यर्त्यांची गर्दी पाहून आणि पाठिंबा पाहून सतेज पाटलांच्या डोळ्यात आश्रू आल्याचं सांगत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यास सांगितलं. "जे काही घडलं त्यावर मी आज काही टीका-टीप्पणी करणार नाही. मात्र जे घडलं त्याला समोरे जाण्याचं समर्थ्य तुम्ही मला द्यावं अशी माझी विनंती आहे," असं सतेज पाटील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले.
1)
2)
दरम्यान, आता कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून राजेश लाटकर यांना निवडून आणू असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. राजेश लाटकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, आपण काँग्रेसचे कार्यकर्ते असून त्याच विचारांचे आहोत. आपण वरिष्ठांशी यासंदर्भात बोलणार आहोत असंही राजेश लाटकर म्हणाले. तसेच सतेज पाटील यांच्याशीही चर्चा करणार असल्याचं राजेश लाटकर यांनी सांगितलं. आपली उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर स्वाभिमान जपण्यासाठी आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याचं राजेश लाटकर यांनी सांगितलं. त्यामुळे आता सतेज पाटील काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.