`गादीबद्दल आदर ठेवणं हे माझ्यासारख्या...`; छत्रपतींबद्दल वापरलेल्या भाषेवरील टीकेवर सतेज पाटील स्पष्टच बोलले
Satej Patil On Chhatrapati Shahu Maharaj Family: कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोमवारी घडलेल्या नाराजी नाट्यानंतर सतेज पाटलांवर छत्रपतींच्या कुटुंबाबद्दल केलेल्या विधानावरुन टीका होत असतानाच या टीकेला त्यांनी स्वत: उत्तर दिलं आहे.
Satej Patil On Chhatrapati Shahu Maharaj Family: कोल्हापूर उत्तरमधून महाविकास आघाडीच्या उमेदवाराने अचानक माघार घेतल्याने राज्यभरामध्ये एकच खळबळ उडाली. अखेरच्या अर्ध्या तासामध्ये मधुरीमाराजे (Madhurima Raje) यांनी माघार घेतल्यानंतर कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. यावेळेस छत्रपती शाहू महाराजांसहीत सतेज पाटील यांच्यामध्ये तणावपूर्ण वातावरणात झालेलं संभाषणही चर्चेत राहिलं. कोणतीही पूर्व कल्पना न देता माघार घेतल्याने सतेज पाटील चांगलेच संतापले होते. मात्र यावरुन सतेज पाटलांवर कठोर शब्दांमध्ये टीका करण्यात आली. छत्रपतींच्या कुटुंबाविरोधात सतेज पाटील अशी विधान कशी करु शकतात याबद्दल विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. असं असतानाच आता सतेज पाटलांनी या विषयावरुन टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.
काल जिल्हाधिकारी कार्यालयात काय घडलं? सतेज पाटील काय म्हणाले?
मधुरीमाराजे यांना काँग्रेसकडून एबी फॉर्म देण्यात आला होता. यानंतर त्यांनी अर्ज देखील दाखल केला होता मात्र अगदी तो शेवटच्या क्षणी मागे घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खासदार शाहू छत्रपती यांच्या समोर सतेज पाटील यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त करुन दाखवली. मधुरीमाराजे यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने सतेज पाटील मात्र चांगलेच संतापलेले पहायला मिळालं. "दम नव्हता तर उमेदवारी कशाला घेतली?" अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. "जर लढायचे नव्हते तर उमेदवारी घ्यायलाच नको होती. मी माझी ताकद दाखवली असती," अशा शब्दांत त्यांनी नाराजी बोलून दाखवली. पक्षातील वरिष्ठांनी आधी उमेदवारी जाहीर केलेल्या राजेश लाटकर (Rajesh Latkar) यांची उमेदवारी रद्द करून मधुरीमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्याने काँग्रेस तोंडघाशी पडली.
नक्की पाहा >> ...अन् सतेज पाटील कार्यकर्त्यांसमोर ढसाढसा रडले! कोल्हापूरमधील राड्यानंतरचा Video पाहाच
मला तोंडघशी पाडण्याची...
अर्ज मागे घेऊन मधुरीमाराजे गेल्यानंतर दरवाजातच सतेज पाटील यांनी शाहू छत्रपती यांच्या समोरच, "हे पूर्णपणे माझी फसवणूक केल्यासारखं आहे. हे नाही चालणार. मग आधीच नाही म्हणून निर्णय घ्यायला हवा होता. मला काही अडचण नव्हती. हे चुकीचं आहे महाराज. हे मला काही मान्य नाही. मला तोंडघशी पाडण्याची गरज नव्हती," असं म्हणत नाराजी व्यक्त केली. तसेच शाहूंच्या समर्थकांना सतेज पाटलांनी, "हे अजिबात बरोबर नाही, तुम्ही जेवढ्यांनी आग लावली त्या सर्वांना सांगत आहे," असं म्हणत संताप व्यक्त केला.
नक्की वाचा >> '...यासारखं पाप नाही, बाळासाहेब राज ठाकरेंना माफ करणार नाहीत'; 'प्रॉपर्टी'वरुन राऊत बरसले
श्रीमंत छत्रपती शाहू माहाराजांबद्दल...
सतेज पाटलांनी वापरलेल्या या भाषेवरुन टीका होत असल्याचा उल्लेख करत पत्रकारांनी आज सकाळी त्यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना सतेज पाटलांनी, "माझ्याकडून कोणावरही वैयक्तिक टीका टीप्पणी होणार नाही. घटना घडून गेली आहे. त्यावर बोलून नवीन वाद मी निर्माण करणार नाही. मला आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू माहाराजांबद्दल आदरच आहे. गादीबद्दल आदर ठेवणं हे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची भूमिका राहिली आहे आणि यापुढेही राहणार आहे," म्हटलं.
नक्की वाचा >> माघार, बाचाबाची, रडारड... आता कोल्हापूर उत्तरमध्ये पुढे काय? सतेज पाटील हसत म्हणाले, 'छत्रपती शाहू...'
म्हाडिकांच्या टीकेला उत्तर...
स्वत:च्या राजकारणासाठी आपण छत्रपती घराण्याबद्दल सतेज पाटील विधानं करत असल्याची टीका धनंजय म्हाडिकांनी केल्याचा संदर्भ देत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना सतेज पाटलांनी हसतच, "म्हाडिकांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे. लोकसभेला त्यांनी का उलटा प्रचार केला? संजय मंडलिक आदरणीय महाराजांबद्दल बोलले. त्यावर ते काही बोलले का? ठीक आहे शेवटी हे राजकारण होणार. मात्र हे मागे टाकून पुढे जाणं हे माझं ध्येय आहे," असं उत्तर दिलं.