Maharashtra Assembly Election  Amit Thackeray On Mahim Assembly Constituency: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंनी आज माहीम मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेस अमित ठाकरेंबरोबर राज ठाकरेंबरोबरच इतर कुटुंबीय उपस्थित होते. अमित ठाकरेंनी पायी चालत काही ठिकाणी नतमस्तक होत, काही मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजेरी लावली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर माहिममधून माघार घेत असल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता अमित ठाकरेंनी अगदी हात जोडत उत्तर दिलं.


अर्ज भरल्यानंतर पहिली प्रतिक्रिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अमित ठाकरेंनी मिळत असलेला पाठिंबा उत्साहवर्धक असल्याचं सांगितलं. "अर्ज भरायला छान प्रतिसाद मिळाला. मी लहानपणापासून ज्यांच्या समोर वाढलो, ज्यांना मी काका म्हणतो ते राज ठाकरेंचे खूप जुने सहकारी आहेत. हे लोक आज आले त्याचं मला फार बरं वाटलं. एवढ्या उत्साहात मला प्रतिसाद मिळाल्याचं बरं वाटतंय," असं अमित ठाकरेंनी म्हटलं. प्रासरमाध्यमांनी यावेळी सदा सरवणकर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची चर्चा असल्यावरुन अमित ठाकरेंना प्रश्न विचारला.


सदा सरवणकर यांच्याबद्दलचा प्रश्न विचारला असता काय म्हणाले अमित ठाकरे?


"असं म्हटलं जात आहे की सदा सरवणकर आणि दुसरे उमेदवार अर्ज मागे घेणार होते अशी चर्चा होती," असं म्हणत महिला पत्रकाराने प्रश्न विचारला असता अमित ठाकरेंनी, "मला माहित नाही. मात्र मी माझं काम प्रामाणिकपणे करणार आहे. तुमचे आशिर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. कोणी फॉर्म मागे घेणार आहे का मला माहिती नाही," असं उत्तर दिलं. अर्ज भरताना दडपण आलं का? या प्रश्नाला उत्तर देताना, "अर्ज भरताना नाही तर तुमच्याशी बोलताना दडपण वाटतंय," असं अमित ठाकरे म्हणाले. 


नक्की पाहा >> Video: ...अन् अजित पवारांनी कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या Gift वरील 'तो' शब्द लपवला; अवघडत म्हणाले, 'काही...'


मी माझा दृष्टीकोन घेऊन...


"माहिममध्ये अटीतटीची लढाई आहे," असं म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, "मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय. समोर कोण आहे मी बघत नाहीये. मी माझा दृष्टीकोन घेऊन लोकांपर्यंत पोहोचणार. शेवटी तो निर्णय लोकांचा आहे. जो 23 तारखेला आपल्याला कळेल," असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे. 


अमित ठाकरे हात जोडून म्हणाले...


हिंदीमधून प्रतिक्रिया विचारण्यात आली असता आधी अमित ठाकरेंनी हिंदी फारसं चांगलं नसल्याचं म्हटलं. तरीही अमित ठाकरेंना हिंदीमधून प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर, "राज ठाकरेंनी माझ्यावर विश्वास टाकला. ते अर्ज भरण्यासाठी माझ्याबरोबर आल्याने मला छान वाटलं. मी दारोदारी जाऊन प्रचार करणं पसंत करेन," असं अमित ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना हिंदी पत्रकारांनी सदा सरवणकरांच्या उमेदवारीबद्दल प्रश्न विचारला असता, "मी माझ्या पॅशन आणि डेडिकेशनने काम करत राहील. मला त्यांच्याबद्दल काही ठाऊक नाही," असं अमित ठाकरे अगदी हात जोडून म्हणाले.