Maharashtra Assembly Election Mahim Assembly Constituency: माहिममधील निवडणुकीचा गोंधळ संपता संपताना दिसत नाहीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी महायुतीमधील सत्ताधारी पक्षांचा विरोध झुगारत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र सरवणकरांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी आता त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असल्याने भाजपाची भूमिका त्यांना पाठिंबा देण्याची असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याची परतफेड म्हणून अमित ठाकरेंना सहकार्य करण्याच्या भूमिकेत महायुती असले तरी सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. अशातच सदा सरवणकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुरुवारी रात्री 'वर्षा' बंगल्यावर भेटीसाठी बोलवलं होतं. 


शिंदे म्हणाले, पुन्हा विचार करा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सदा सरवणकर यांच्यात जवळपास 2 तास चर्चा झाली. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सरवणकरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना केली. मात्र सरवणकरांनी याला नकार देत आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं. तसेच आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये फॉर्म मागे घेणार नाही असं सरवणकरांनी मुख्यमंत्री शिंदेंना सांगितलं. यावर मुख्यमंत्री शिंदेंनी सरवणकरांना पुन्हा एकदा यावर विचार करा असा सूचक सल्ला दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांबरोबर सरवणकरांची उद्या पुन्हा चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. सध्या महायुतीकडून सरवणकरांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 


शिंदेंची ती ऑफर नाकारली


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सदा सरवणकरांना विधान परिषदेच्या आमदारकीची ऑफर दिली. उमेदवारी मागे घ्या, तुम्हाला विधान परिषदेवर पाठवू अशी ऑफर शिंदेंनी सरवणकरांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र सरवणकरांनी ती ऑफर फेटाळली. आपल्याला निवडणूक लढवण्यासाठी मतदारांनी सांगितलं असून आपण निवडणूक लढवणारच यावर सरवणकर ठाम असून तसं त्यांनी मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे. 


सोशल मीडियावर पोस्ट


सरवणकर यांनी सोशल मीडियावरुनही, राज ठाकरे यांनाच विनंती करताना, "तुम्ही मला समजून घ्या ,आणि मला लढू द्या," असं म्हटलं आहे. काही झाले तरी मी निवडणूक ही लढविणार आहे असा निश्चय सरवणकरांनी केला आहे. आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आपण राज ठाकरे यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. "राज ठाकरे हे प्रचंड मोठे नेते आहेत. ते माझ्यासारख्या एका सामान्य शिवसैनिकाला या सगळ्यात मदत करतील. सहकार्य करतील. या मतदारसंघाला मी माझी आई मानतो. ते हे नातं तोडणार नाही अशीच माझी अपेक्षा आहे," असं सरवणकर म्हणाले आहेत.



उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर आहे.