फडणवीसांच्या `त्या` विधानानंतर सरवणकर म्हणाले, `मी राज ठाकरेंना भेटणार आणि...`
Maharashtra Assembly Election Sada Sarvankar: माहिममधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही सदा सरवणकर इथून लढणार की नाही हे अद्यापही अनिश्चित असून सध्या अमित ठाकरे येथून लढत असल्याने जोरदार चर्चा सुरु आहेत.
Maharashtra Assembly Election Sada Sarvankar: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा मुंबईतील सर्वाधिक मतदारसंघ हा माहीमचा असल्याचं दिसत आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र त्यांच्या समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंचं आव्हान आहे. त्यामुळेच अमित ठाकरेंसाठी सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना, 'अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याची भाजपाची भूमिका आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांचेही तसेच म्हणणे होते,' असं विधान केलं आहे. त्यामुळेच सरवणकर दबावाखाली अर्ज मागे घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच स्वत: सरवणकरांनी बुधवारी रात्री उशीरा 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. याच दरम्यान सरवणकरांनी थेट राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचंही सांगितलं आहे.
थेट राज ठाकरेंना भेटणार
माहीम विधानसभा मतदारसंघ सध्या प्रचंड चर्चेत असून सध्याच्या परिस्थितीनुसार या ठिकाणी अमित ठाकरे विरुद्ध शिंदेंच्या पक्षातील सदा सरवणकर यांच्यात जागेवरुन संघर्ष सुरु आहे. सदा सरवणकर या ठिकाणाहून माघार घेणार का याबद्दल चर्चा सुरु असतानाच सरवणकरांनी आधी समाज माध्यमांवरुन आणि त्यानंतर एका खासगी मुलाखतीमध्ये राज ठाकरेंना भेटणार असल्याचं म्हटलं आहे. सरवणकर यांनी सोशल मीडियावरुनही, राज ठाकरे यांनाच विनंती करताना "तुम्ही मला समजून घ्या ,आणि मला लढू द्या," असं म्हटलं आहे. काही झाले तरी मी निवडणूक ही लढविणार आहे असा निश्चय सरवणकरांनी केला आहे. आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आपण राज ठाकरे यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. "राज ठाकरे हे प्रचंड मोठे नेते आहेत. ते माझ्यासारख्या एका सामान्य शिवसैनिकाला या सगळ्यात मदत करतील. सहकार्य करतील. या मतदारसंघाला मी माझी आई मानतो. ते हे नातं तोडणार नाही अशीच माझी अपेक्षा आहे," असं सरवणकर म्हणाले आहेत.
रात्री मुख्यमंत्र्यांची भेट
दरम्यान, बुधवारी रात्री सदा सरवणकरांनी 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम असून आता मुख्यमंत्री शिंदे त्यांची कशी समजूत काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सदा सरवणकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आपला निर्णय बदलतात की निवडणूक लढवतात हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच.
नक्की वाचा >> शिंदे, ठाकरे, BJP ला एकाच वेळी नडणारे सरवणकर किती श्रीमंत? 28 लाखांची कार, 2 फ्लॅट्स अन् एकूण संपत्ती...
फडणवीसांनी केला बैठकीचा उल्लेख
बुधवारी मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांना अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यासंदर्भात महायुतीची भूमिका काय आहे यासंदर्भात विचारणा केली. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी, "अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत मुख्यमंत्री यांची देखील मान्यता होती. परंतु काही अडचणी आल्या. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचे म्हणणं होत की तसं झालं की मतं उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे जातील," असं सांगितलं. सदा सरवणकरांसंदर्भात बोलताना, "सदा सरवणकर माघार घेणार का हे आम्ही ठरवू बैठकीत," असंही फडणवीस यांनी म्हटलं. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर आहे.