Maharashtra Assembly Election Big Blow To CM Shinde Raj Thackeray: लोकसभा निवडणुकीला महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला अल्टीमेटम दिल्यानंतर नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमधील घटक पक्ष मनसेला सहकार्य करण्याच्या विचाराचे असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी माहीमच्या स्वपक्षीय उमेदवाराला कळवतानाच तुमचा काय तो निर्णय घेण्यासाठी 24 तासांचा वेळ घ्या असा अल्टीमेटम दिला. आता या उमेदवाराने थेट मुख्यमंत्र्यांविरोधात जाण्याचा निर्णय घेतला असून त्यावर ठाम असल्याचं सूचित केलं आहे. या उमेदवाराच्या मुलाचं व्हॉट्सअप स्टेटस सध्या चर्चेत असून त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत. हे व्हॉट्सअप स्टेटस शिंदेंबरोबरच मुलाचा विजय सुखकर करण्याच्या राज ठाकरेंच्या मनसुब्यांना सुरुंग लावणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नेमकं काय आहे या स्टेटसमध्ये आणि या उमेदवाराचं म्हणणं काय आहे पाहूयात...


नेमकं घडलंय काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महीम मतदारसंघातून एकनाथ शिंदेंनी विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर करत पक्षाचा एबी फॉर्म दिला. मात्र त्यानंतर याच मतदारसंघातून मनसेनं अमित ठाकरेंना उमेदवारी जाहीर केली. राज ठाकरेंचे पुत्र अमित हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तसेच भारतीय जनता पार्टीचाही अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असतील तर सहकार्य करण्याची भूमिका असल्याचं मुंबई भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच रविवारी मुख्यमंत्री शिंदेंनी सूचक पद्धतीने महायुतीमधील पक्षांची भूमिका अमित ठाकरेंना सहकार्य करण्याची असल्याचं कळवलं. मनसेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला असून इतरही काही ठिकाणी मनसे उमेदवार देणार नसल्याचं समजतं. याच पार्श्वभूमीवर महीममधून शिंदेंचा पक्ष उमेदवार मागे घेणार अशी चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर सदा सरवणकर यांना समर्थन दशर्वण्यासाठी शनिवारी त्यांच्या कार्यालयाबाहेर समर्थकांची मोठी गर्दीही जमली. या गर्दीला संबोधित करताना सरवणकर यांनी आपण उमेदवारी अर्ज भरणारच आणि मुख्यमंत्र्यांचा आपल्याला आशिर्वाद असल्याचं सांगितलं होतं. 


रविवारच्या नाट्यमय घडामोडी


सदा सरवणकर यांना आपली भूमिका ठरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रविवारी पहिल्यांदा झालेल्या भेटीदरम्यान 24 तासांची मुदत दिली. महायुतीकडून माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरेंना पाठिंबा देण्याच्या भूमिकेत आहे. आपल्या या भूमिकेवर महायुती ठाम असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सदा सरवणकर यांना सांगितलं आहे. राज ठाकरे यांनी लोकसभेच्या वेळेस महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. यापुढेही त्यांची मदत होईल असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सदा सरवणकर यांना सांगितलं असल्याचं समजत. या चर्चेनंतर सरवणकर पुन्हा 'वर्षा' निवासस्थानी पोहोचले होते. मुख्यमंत्री शिंदेंनी अल्टीमेटम दिल्यानंतर सदा सरवणकर वर्षा बंगल्यावरुन निघाले खरे. मात्र रात्री उशीरा पुन्हा ते वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले. अल्टीमेटम मिळाल्यानंतर काही तासांमध्ये ते पुन्हा शिंदेंच्या निवासस्थानी आले. या दुसऱ्या भेटीदरम्यान त्यांनी सरवणकर यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली भूमिका मांडल्याचे समजते. मात्र ही दुसरी भेट अवघ्या दहा मिनिटांसाठी होती. दहाव्या मिनिटाला सरवणकर 'वर्षा'मधून बाहेर पडले. आपण उद्या म्हणजेच सोमवारी, 28 ऑक्टोबर रोजी अर्ज भरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगून सरवणकर 'वर्षा'बाहेर पडल्याचं समजतं.


नक्की वाचा >> ठाकरे-शिंदेंना 'तो' एकटाच नडणार? माघार घेण्यास नकार, अवघ्या 10 मिनिटात CM शिंदेंच्या घरुन...


ते व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत


त्यामुळेच आज सरवणकर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी आपल्या व्हॉट्सअपवर एक स्टेटस ठेवलं आहे. त्या स्टेटसनुसार सरवणकर हे अर्ज भरण्यावर ठाम असून तो केवळ आजच्याऐवजी उद्या म्हणजेच अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दाखल करणार आहेत. "आमदार सदा सरवणकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता सर्वांनी शाखा क्रमांक 194, सामना प्रेस प्रभादेवी इथे उपस्थित रहावे," असं समाधान यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर म्हटलं आहे. मागील अनेक दशकांपासून माहिममधून आमदार असलेल्या सदा सरवणकर यांनी महायुतीमधील घटक पक्षांचा आणि खुद्द मुख्यमंत्र्यांचा विरोध डावलून खरोखरच अर्ज भरला तर मुख्यमंत्री शिंदेंबरोबरच ते राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंसाठी अडचणीचं ठरु शकतं. 


नक्की वाचा >> पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'



...तर मतदारसंघात तिहेरी लढत


सरवणकरांनी अर्ज भरला तर पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार की सरवणकरांच्या हट्टासमोर मुख्यमंत्री शिंदे नमतं घेणार हे दोन दिवसांमध्ये स्पष्ट होईल. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या म्हणजेच 29 ऑक्टोबर हा शेवटचा दिवस असून अर्ज मागे घेण्याची मुदत 4 तारखेची आहे. या घडामोडींमुळे माहीम मतदारसंघ चर्चेत असतानाच आज अमित ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. या मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेनं महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सरवणकर रिंगणात उतरले तर इथे तिहेरी लढत होईल, असं चित्र दिसत आहे.