Maharashtra Assembly Election Nawab Malik On BJP: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नवाब मलिक यांना एबी फॉर्म देत अधिकृत उमेदवार म्हणून पाठिंबा दिल्या. मात्र यावरुन आता अजित पवारांचा पक्ष आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. नवाब मलिक यांनी अजित पवारांच्या पक्षाकडून अर्ज दाखल केल्यानंतर 'भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही', असा पुनरुच्चार मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. भाजपाच्या या भूमिकेवरुन नवाब मलिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 


जिंकून येणारच: मलिक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नवाब मलिक यांनी, "आज मी नामांकन अर्ज दाखल केला. अपक्ष आणि पक्षाचा अर्ज होता. 2 वाजून 55 मिनिटांनी पक्षाचा अधिकृत एबी फॅार्म आला. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी विश्वास दाखवला. या भागात दहशत आहे. घाणीच साम्राज्य आणि ड्रग्जचा विळखा आहे. आरोग्याच्या समस्या आणि बाल मृत्यू दर अधिक आहे. विकास करण्यासाठी वाव आहे. इतर कोणीही इथे लढू शकत नव्हता. लोकांच्या विश्वासावर मी जिंकून येणार," असा विश्वास व्यक्त केला. 


भाजपाने काय म्हटलं आहे?


"भाजपची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट राहिली आहे. महायुतीमधील सर्व पक्षांनी आपापले उमेदवार आपणच ठरवायचे आहेत. विषय फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना दिलेल्या उमेदवारीबद्दल आहे. यासंदर्भात भाजपची भूमिका याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मीही वारंवार स्पष्ट केली आहे. आता पुन्हा एकदा सांगतोय, भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही. आमची भूमिका दाऊद आणि दाऊदशी संबंधित केससंदर्भातील व्यक्तीच्या प्रचाराची नाही", असे आशिष शेलार मलिक यांना विरोध करताना म्हणाले.



भाजपाच्या विरोधावर नवाब मलिक काय म्हणाले?


"शिवसेनेकडून इथे उमेदवारी दिली. भाजपा प्रचार करणार नाही असं कळतंय. मी लोकांच्या विश्वासावर मी निवडून येईल. कोणाचाही विरोध असला तर जनतेचा पाठिंबा आहे," असं नवाब मलिक यांनी एबी फॉर्म मिळाल्यानंतर प्रतिक्रिया नोंदवाताना म्हटलं आहे. "ही युती वैचारिक नाही तर राजकीय आहे. दादा (अजित पवार) हे संकटाच्या काळात माझ्या आणि माझ्या कुटुंबासोबत राहिले म्हणून मी दादांच्या सोबत आहे. इतरांकडे मी दुर्लक्ष करतो. आता वेळ निघून गेली. जर मला उमेदवारी द्यायची नसती तर पक्षाने फॅार्म दिला नसता," असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.


देशद्रोहावर काय म्हणाले?


देशद्रोह आरोपाबद्दल बोलताना नवाब मलिक यांनी, "हा कोर्टात विषय आहे. मी त्यावर बोलू शकत नाही पण मी निर्दोष आहे. शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार घेऊन आम्ही पुढे जाऊ, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला. तसेच शरद पवारांबद्दल बोलताना, "शरद पवार मोठे नेते आहेत. तो कौटुंबिक वाद आहे. मला विश्वास आहे की अजित पवार जिंकणार. आमचे इतर नेते देखील जिंकणार," असंही नवाब मलिक म्हणाले.