मनोज जरांगेंची विधानसभेतून माघार; फायदा कोणाला? तोटा कोणाला?
Manoj Jarange Vidhansabha: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघारीची घोषणा करून यू-टर्न घेतलाय.
Manoj Jarange Vidhansabha: जरांगे पाटलांनी निवडणुकीच्या मैदानातून अखेर माघार घेतली आहे. सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय. इतकंच नाही तर आता पाडापाडी करणार असा इशाराही जरांगेंनी दिलंय. त्यामुळे जरांगेंच्या माघारीमुळे कुणाला फायदा आणि कुणाला तोटा होणार? मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघारीची घोषणा करून यू-टर्न घेतलाय. अंतरवाली सराटीतल्या पत्रकार परिषदेत जरांगेंनी ही घोषणा केलीय. सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय. आता निवडणूक लढायची नाही तर पाडायचं असा इशाराही जरांगे पाटलांनी दिलाय.
जरांगेंची माघार का?
मित्रपक्षांकडून उमेदवार यादी आली नाही. तसेच एका जातीवरून कोणीही निवडून येऊ शकत नाही, असे कारण जरांगेंकडून सांगण्यात आले. मराठा उमेदवार पडला तर जातीची लाज जाईल. त्यामुळे ही माघार नाही, हा गनिमी कावा असल्याचे सांगत कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नसल्याचे कारणही त्यांनी सांगितले.
छगन भुजबळांनी जरांगेंच्या निर्णयाचं स्वागत केलंय. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर बारामतीच्या आदेशावरून माघार घेतल्याचा आरोप केलाय.
EXCLUSIVE: 'आज माघार घेऊन रणांगणातून पळाले, उद्या इतिहासजमा होतील' लक्ष्मण हाकेंची जरांगेवर बोचरी टीका
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा फटका महायुतीला बसला होता. मात्र आता शेवटच्या क्षणी विधानसभा निवडणुकीतून जरांगे पाटलांनी माघार घेतलीय. उमेदवार उभे करणार नसलो तरी निवडणुकीत पाडापाडी करणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिलाय.
जरांगे पाटलांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली असली तरी...हा गनिमी कावा असल्याचं सूचक वक्तव्य केलंय. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरनं महायुतीला मोठा धक्का दिला होता. आता विधानसभेत उमेदवार दिले नसले तरी जरांगे कुणाचं राजकीय नुकसान करणार हे पाहावं लागणार आहे. जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानं कुणाला फायदा होणार आणि कुणाला तोटा, हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.
'जरांगेंनी रणांगणातून पळ काढला'
मनोज जरांगेंनी माघार घेऊन रणांगणातून पळ काढला. सरकार तुमची बाजू ऐकत नसेल तर जनतेच्या दरबारात जाऊन भूमिकेचे समर्थन मिळवण्याची संधी होती. पण जरांगे कोणाच्या तरी सांगण्यावरुन आंदोलन करतात, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. लोकसभेवेळी महाविकास आघाडीच्या बाजूने सभा घेतल्या. यात महायुतीतले काही लोक आहेत. जरांगेच्या मतांची भीती वाटणाऱ्यांना ओबीसी, व्हीजीएनटीच्या मतांचं काही वाटत नाही, याची खंत वाटत असल्याचे ते म्हणाले.जरांगे लढले असते तर त्यांच्या मागे किती ताकद आहे ते कळले असते. त्यांच्या मागे किती मराठे आहे ते कळले असते, असे लक्ष्मण हाके म्हणाले. लोकसभेत जरांगे फॅक्टर चालला. पण भाजप नको हे नेरेटिव्ह दलित आणि मुस्लिमांमध्ये पसरले. एका जातीला आरक्षण मिळत नसतं. महाराष्ट्रात पाणी, बेरोजगार, आयटी असे अनेक प्रश्न आहेत. ओबीसींमुळे आपल्यावर ही वेळ आल्याचे जरांगेंना वाटते. आज निवडणुकीतून माघार घेतली. उद्या आंदोलनातून माघार घेतील. भविष्यात जरांगे इतिहासजमा झालेले असतील, असे लक्ष्मण हाके म्हणाले. महाराष्ट्राच्या महत्वाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होतंय आणि जरांगेंकडे सर्वांचे लक्ष लागते, हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.