MNS Demands 20 Seats from Mahayuti: राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण आता विधानसभा निवडणुकीसाठी मनसनेने महायुतीकडे जागांची मागणी केली आहे. मनसेने महायुतीकडे 20 जागा मागितल्या आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. यामध्ये मुंबई (Mumbai) आणि एमएमआर (MMR) परिसरातील जागांची संख्या जास्त आहे. 


मनसेनं महायुतीकडे कोणत्या जागा मागितल्या आहेत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेने महायुतीकडे मागितलेल्या 20 जागांमध्ये वरळी, दादर माहिम, शिवडी, मागाठाणे, दिंडोशी, जोगेश्वरी, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, चेंबूर, ठाणे, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण, नाशिक पूर्व, वणी, पंढरपूर, औरंगाबाद मध्य आणि पुणे या जागांचा समावेश असल्याची माहिती आहे. 


वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात लढणार?


सूत्रांच्या माहितीनुसार, वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेचे संदीप देशपांडे यांना मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. तर दादरमधून नितीन सरदेसाई आणि वर्सोवातून शालिनी ठाकरे इच्छुक आहेत. 


मनसेला एनडीएकडून शपथविधीचं निमंत्रण का नाही?


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला होता. तसंच महायुतीच्या नेत्यांसाठी त्यांनी जाहीर सभादेखील घेतल्या होत्या. राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडूनही आले. पण इतकं असतानाही राज ठाकरेंना एनडीएच्या शपथविधी सोहळ्यासाटी आमंत्रित करण्यात आलं नाही. 


यावर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी घाईमध्ये निमंत्रण द्यायचं राहिलं असेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. 


मनसे नाराज


मनसे नेते प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंना नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला बोलवलं असतं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील आनंद झाला असता, असं म्हटलं आहे. महायुतीला आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला. महायुतीसाठी आमचे कार्यकर्ते राबत होते. आम्हाला निमंत्रण असतं तर ते कळलं असतं. मात्र राज्यात मोठं अपयश आल्याने महायुतीचे नेते आम्हाला आमंत्रण देण्यात विसरले असावेत, असं महाजन म्हणाले. 


आपल्याच लोकांना आमंत्रण देण्यासाठी विसरतात. मैत्री जपणारी पिढी आता भाजपामध्ये संपली आहे. गरज असेल तेव्हा उंबरठे झिजवायाचे आणि काम झाल्यावर दार लावायचे. त्याचे परिणाम त्यांनी लोकसभा निवडणुकीत पाहिले अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला. आमची त्यांच्यासोबत युती नव्हती, आमचा फक्त नरेंद्र मोदी यांना पाठिंबा होता. राज ठाकरे यांना निमंत्रण होते की नाही? हे फक्त स्वतः राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सांगू शकतात, असेही ते म्हणाले.