महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अजित पवारांनी तातडीने पत्रकार परिषद बोलावली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. या पत्रकार परिषदेत अजित पवार आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा करण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान अजित पवार काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या पत्रकार  परिषदेला महत्त्व प्राप्त झालं आहे. तसंच विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला महायुतीत सर्वात कमी जागा मिळत असल्याने नेत्यांमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व घडामोडी पाहता अजित पवार पत्रकार परिषदेत एखादा मोठा निर्णय जाहीर करतील अशी चर्चा आहे. 


मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-अजित पवारांमध्ये बाचाबाची?


मंत्रिमंडळाच्या बैठकींचा धडाका सुरु असून मागील काही आठवड्यांमध्ये अनेकदा मंत्रिमंडळाच्या बैठकी पार पडल्या आहेत. मात्र गुरुवारी म्हणजेच 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे,


प्रकाश आंबेडकरांचं भाकीत खरं ठरणार?


राज्यात विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यात मोठी उलथापालथ होणार, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत मोठा भूकंप होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तशा संभाव्य तारखाही त्यांनी सांगितल्या आहेत. झी २४ तासच्या टू द पॉईंट कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. 


प्रकाश आंबेडकर यांनी मुलाखतीत म्हटलं आहे की,  "निवडणुकांनंतर राज्यात मोठी उलथापालथ होणार आहे. महाराष्ट्राला मोठं सरप्राइज मिळणार आहे. पण त्या आधीही म्हणजेच 8 ते 12 ऑक्टबरपर्यंत महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार आहे. मात्र वंचित या भूकंपाचा भाग राहणार नाही. सत्तेतील पक्ष व बिगर पक्ष या भूकंपाचा भाग राहतील. निवडणुकीच्या आधी व नंतरदेखील मोठ्या घडामोडी राज्यात घडतील".