पुण्यात जागा 8, इच्छुक भरमसाठ; भाजपला बंडखोरीचं टेन्शन?
Pune BJP: पुण्यात काही आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
Pune BJP: पुण्यात भाजपच्या आमदारांना स्वकियांकडूनच आव्हान मिळू लागलंय. आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यास भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केलाय. अनेक इच्छुकांनी आमदारांविरोधातच दंड थोपटलेत. त्यामुळं काही आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. उमेदवारी मिळाली तरी पुढं बंडखोरीचा सामनाही आमदारांना करावा लागण्याची शक्यता आहे.
अनेक इच्छुक उमेदवारीसाठीच्या स्पर्धेत
पुण्यात भाजपच्या आमदारांसमोर एक वेगळंच संकट निर्माण झालंय. 2019च्या निवडणुकीत निवडून येऊनही पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही याची शाश्वती नाही. मागच्या निवडणुकीत ज्यांनी आमदारकीसाठी प्रचार केला तेच आता उमेदवारीवर दावेदारी करु लागलेत. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना कोथरुडमध्येच पक्षातूनच आव्हान दिलं जाऊ लागलंय. भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कोथरुडच्या जागेवर दावा केलाय. खडकवासल्यामध्ये विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्या उमेदवारीला माजी नगरसेवक प्रसन्न जगताप आणि दिलीप वेडे पाटील यांनी विरोध केलाय. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे असताना तिथून प्रदेश प्रवक्ते मधुकर मुसळे उमेदवारीसाठीच्या स्पर्धेत आहेत. उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याची त्यांनी तयारी चालवलीय.
आमदारांच्या उमेदवारीची वाट इच्छुकांमुळे बिकट
भाजपचा विद्यमान आमदार असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये उमेदवारीसाठी फारशी स्पर्धा नाहीये. या ठिकाणी आमदार सुनील कांबळे किंवा त्यांचे बंधू माजी आमदार दिलीप कांबळे दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांच्या उमेदवारीला माजी नगरसेवक आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी आव्हान दिलय. मिसाळ यांनी इच्छुकांनी दावेदारी करण्यात गैर नसल्याचं म्हटलंय. पुण्यात भाजपच्या आमदारांच्या उमेदवारीची वाट इच्छुकांनी बिकट करुन टाकलीय. उमेदवारी मिळाली तरी बंडखोरीचं टेन्शनही भाजपच्या आमदारांना असणार यात शंका नाही.
महादेव जानकर महायुतीतून बाहेर
राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर महायुतीतून बाहेर पडणार आहेत. महायुतीतून बाहेर पडम्याची घोषणा महादेव जानकर यांनी केली आहे. महादेव जानकर यांचा रासप पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. 288 मतदार संघाची चाचपणी करण्यात आलू असून लवकरच महादेव जानकर उमेदवरांची यादी करणार आहेत. विधानसभेत रासपला 40 जागा महायुतीनं द्याव्यात, अन्यथा 288 जागांवर स्वबळावर लढण्याची तयारी करत आहोत, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकरांनी महायुतीला दिला होता. तसंच जानकरांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केले होते.महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात असल्याचं सांगण्यात येतंय. महायुतीत मोठा भाऊ असलेला भाजप 158 जागा लढणार असं सांगण्यात येतंय. तर शिवसेनेला 70 आणि राष्ट्रवादीला 60 जागा देण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. या जागावाटपात घटक पक्षांना कोणतेही स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे महादेव जानकर नाराज आहेत. भाजप महादवे जानकर यांची मधरणी करणार का? याकडे देखील सर्वांचेच लक्ष लागले आहे.