`मैं समंदर हूं, लौटकर आऊंगा` आठवतंयत का फडणवीसांचे ते शब्द? विक्रमी कामगिरीनंतर Video Viral
Maharashtra Assembly Election result live 2024 Devendra Fadnavis video viral : देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल.
Maharashtra Assembly Election result live 2024 Devendra Fadnavis video viral : महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीला अडचणीत आणणाऱ्या महाविकासआघाडीच्या वाट्याला विधानसभा निवडणुकीच्या वेळी मात्र अपयश आल्याचं पाहायसा मिळालं. मुळात लोकसभेला मिळेल्या अपयशानं खचून न जाता भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी जोमानं काम सुरू केलं आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठीची सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर सोपवली.
फडणवीसांनीसुद्धा अतिशय प्रभावीपणे ही कामगिरी आणि पक्षानं आपल्यावर दाखलेला विश्वास सार्थ ठरवत पक्षाचा विजय खेचून आणला असंच अनेकांचं मत. एकिकडे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर भाजपचं वर्चस्व दिसत असतानाच दुसरीकडे फडणवीसांचाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
2019 मध्ये फडणवीसांनी राजकीय नेतेमंडळींसमोर केलल्या एका वक्तव्याचाच व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत असून, त्यांनी उच्चारलेले शब्द सत्यात उतरवून आणले अशीच प्रतिक्रिया हा व्हिडीओ शेअर करत अनेकांनी दिली आहे. 2019 मध्ये भाजपच्या वतीनं देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीनंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठीची तयारी केली होती. पण, मुख्यमंत्रीपदावरून मतभेद वाढले आणि अखेर शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ निवडत महिआच्या सूत्रानं सत्ता स्थापन केली.
हेसुद्धा वाचा : Mahim Results 2024 Live Updates : माहिममध्ये उलटफेर होणार? अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार
भाजपसाठी हा मोठा धक्का होता. त्याचवेळी राज्याच्या विधानसभेच्या विशेष सत्रात फडणवीसांनी भाषण करत मोठ्या काव्यात्मक अंदाजात विरोधकांना टोला लगावला. 'मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा... ' असं ते म्हणाले होते. त्यानंतर पुढील पाच वर्षांमध्ये राजकारण असं काही ढवळून निघालं की पुन्हा एकदा सत्तेच्या सोंगट्या फडणवीस आणि भाजपचं सामर्थ्य वाढवताना दिसल्या.
फडणवीसांनी जे वक्तव्य केलं, त्याचा प्रत्येक शब्द जणू आता सत्यातच उचतरत आहे, अशाच भावनेनं त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर त्यांचा हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल केल्याचं पाहायला मिळालं. राहिला मुद्दा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी खुद्द फडणवीस पुन्हा विराजमान होणार का, याविषयीचा तर प्रवीण दरेकर यांनी निकालाच्याच दिवशी केलेल्या वक्तव्यानुसार भाजपचाच मुख्यमंत्री असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून, फडणवीसांच्या नावाला दुजोरा दिला. तेव्हा आता पुढील काही तासातच या प्रश्नाचंही अचूक उत्तर समोर येईल असंच म्हणावं लागेल.