मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीत आपलं खातं खोललं आहे. कल्याण ग्रामीणमधून मनसेचे उमेदवार प्रमोद (राजू) पाटील विजयी झाले आहेत. राजू पाटील यांनी शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांना पराभूत केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभेवेळी 'लावा रे तो व्हिडिओ' म्हणत भाजपा, शिवसेने विरोधात राज ठाकरेंनी प्रचार केला. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत विरोधी पक्षाची धुरा हाती द्या, असं आवाहन मतदारांना केलं. विधानसभा निवडणूकीत सगळ्या सभेत त्यांनी हीच भूमिका मांडली. मनेसेने या निवडणूकीत 100 हून अधिक उमेदवार उभे केले. मात्र मनसेचं इंजिन फक्त एका मतदारसंघावर स्थिरावलं. 


राजू पाटील यांनी 86233 मते मिळाली तर शिवसेनेच्या रमेश म्हात्रेंना 80665 मते मिळाली. राजू पाटील यांनी 5568 मतांनी विजय मिळवला आहे. राजू पाटील आणि रमेश म्हात्रे यांच्या अती-तटीची लढत होती. या एकमेव जागेचा अपवाद वगळता संपूर्ण राज्यात मनसेला कुठेही यश मिळालेलं नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही मनसेला जुन्नरच्या फक्त एका जागेवर विजय मिळाला होता. पण त्यानंतर त्या आमदाराने शिवसेनेते प्रवेश केला. २००९ मध्ये मनसेचे सर्वाधिक १३ आमदार निवडून आले होते. यावेळी जनतेच्या अपेक्षा मनसेकडून वाढल्या होत्या. पण यंदाच चित्र मात्र वेगळं आहे.