बंद खोलीत राजकारण करणाऱ्यांना जनतेने जागा दाखवून दिली - रोहित पवार
रोहित पवारांची राम शिंदेवर मात
मुंबई : कर्जत जामखेड मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार विजयी झाले आहेत. रोहित पवार यांनी भाजपच्या कॅबिनेट मंत्री असलेल्या राम शिंदे यांचा पराभव केला आहे. या मतदार संघात रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात अतितटीची लढत पाहायला मिळाली. कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारने मतदारांची मन जिंकून विजय मिळवला आहे.
2014 मध्ये राम शंकर शिंदे यांनी 84 हजार 058 मतांनी विजय मिळवला होता. पण यावेळी त्यांना पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या रोहित पवार यांनी धुळ चारली आहे. विजयानंतर झी चोवीस तासने रोहित पवारशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी या विजयाकरता सामान्य मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतून भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केलेल्या उमेदवारांवर निशाणा साधला. बंद खोलीत चर्चा करणाऱ्यांनी फक्त व्यक्तीगत स्वतःचा विचार केला. त्यांनी बंद खोलीत जनतेचा विचार केला नाही. आणि जनतेने याचं उत्तर लोकशाही माध्यमातून दिलं आहे, असं रोहित पवार म्हणाले. (हे पण वाचा - 'अबकी बार २२० पार' जनतेने स्वीकारलं नाही- शरद पवार)
तसेच रोहित पवार यांनी जनतेच्या मनातील दुःख बोलून दाखवले. या अगोदर घेतलेल्या निर्णयाचा परिणाम आता शेतकरी, तरूणाई आणि सामान्यांना दिसत आहे. 220 चा अहंकार गळून पडला आहे. आम्ही सर्वसामान्यांना विश्वासात घेऊन काम केलं आणि हा विजय त्याचाच आहे. त्यामुळे तुम्ही जनतेची काम कराल, समाजाचं राजकारण कराल तर तुमचा विजय निश्चित आहे, असं रोहित पवार यावेळी म्हणाले. तसेच सर्वसामान्यांची सेवा आमच्याहातून घडणार आहे, असं देखील ते म्हणाले.