Sada Sarvankar on Raj Thackeray: सदा सरवणकर (Sada Sarvankar) अद्यापही निवडणूक लढण्यावर ठाम असून, आपण वर्षावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) भेट घेतल्याचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (MNS Chief Raj Thackeray) भेट घेऊन त्यांना विनंती करणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच मला विधान परिषदेची ऑफर करण्यात आल्याचं वृत्तही खोटं असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 
 
"वर्षावर गेलो हे खरं आहे. पण बैठक झाली हे खोटं आहे. मुंबईत जवळ असल्याने आम्ही दिवसातून तीनदा वर्षावर जातो. तसं आम्ही संध्याकाळी गेल होतो. मुख्यमंत्री विश्रांती करत होते. आम्ही कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. एकदा मला मुख्यमंत्र्यांनी आशीर्वाद दिले आहेत सांगितल्यानंतर रोज लढणार आहे सांगणं योग्य नाही. ज्यांना असं वाटतं की मी मतदारसंघ सोडावा त्यांनी आपले मतदारसंघ मनसेसाठी रिकामे करावेत. प्रत्येक पक्षाचं स्वत:चं एक धोरण असतं. शिवसेनेच्या जागा कोणालाही द्यायच्या नाहीत असं निश्चित झालं आहे," अशी माहिती सदा सरवणकर यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढे ते म्हणाले, "आम्ही राज ठाकरेंना बाळासाहेबांची प्रतिकृती म्हणून पाहत आहोत. बाळासाहेबांनी कधीही निवडणूक लढवली नसून शिवसैनिकाला मोठं केलं. राज ठाकरेही माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला आशीर्वाद देतील अशी अपेक्षा आहे. म्हणून मी राज ठाकरेंना भेटून विनंती करणार आहे. गेल्या 30 वर्षांपासून माझं आणि मतदारसंघाचं आई-मुलासारखं नातं आहे. हे अबाधित ठेवा, तोडू नका. मी वेळ मागितली असून ती मिळेल तेव्हा जाऊन भेट घेईन". 


"मी बोलणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देणार नाही. महायुतीचा मला पाठिंबा निश्चित आहे. मी माघार घेणार नाही. मला एबी फॉर्म दिलेला आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून मी निवडणूक लढणार आहे. मी प्रचार करणार आहे. आज माझी बैठक आहे. दिवाळी असल्याने कार्यकर्त्यांना घर सोडून या कामात गुंतवू शकत नाही. मला विधान परिषदेवर पाठवण्याची कोणतीही चर्चा झालेली नाही,' असंही त्यांनी सांगितलं. 


"मी माझी भूमिका आधी मांडली असून, रोज मांडण्याची गरज नाही. मुंबईत असल्याने वर्षावर वेळ मिळेल तेव्हा जात असतो. प्रत्येक वेळी भेट होते असंच नाही. प्रसारमाध्यमांकडून काही गोष्टी सोयीस्कर टाळत सांगितल्या जात आहे. फडणवीसांनी नागपुरात महायुतीचा धर्म पाळणार आहोत, तो आमचा उमेदवार असेल असंही सांगितलं होतं. महायुतीत भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना आणि रिपाई आहे असं त्यांनी सांगितलं आहे. महायुतीत मनसे नाही हेदेखील त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे," असं ते म्हणाले. 


मी ठासून सांगितलं आहे की, निवडणूक लढणार असून माघार घेणार नाही. मी जिंकून येणार. जनतेचा तसा कौल आणि इच्छा आहे. कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करावी लागेल असंही ते म्हणाले आहेत.