Markadwadi Ballot Paper Repoll BJP Slams Sharad Pawar: महाराष्ट्रातील मारकडवाडी येथील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरील नाराजीची चर्चा सध्या देशभरामध्ये असून यामागील मुख्य कारण म्हणजे येथील ग्रामस्थांनी पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची केलेल्या तयारीचं आहे. याच ठिकाणी रविवारी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार भेट देणार आहेत. शरद पवार मारकडवाडीत जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत. मारकडवाडी ग्रामस्थांशी शरद पवार रविवारी सकाळी 10 वाजता चर्चा करणार आहेत. ईव्हीएमविरोधात मारकडवाडी येथे बॅलेट पेपरवरील मतदान रद्द करण्यात आलं आहे. जमावबंदी आदेशमुळे मतपत्रिकेवरील मतदान रद्द झाले आहे. मात्र पवारांच्या याच भेटीवरुन भारतीय जनता पार्टीने थेट आक्षेप घेत विरोधकांवर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रमुख प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या पक्षाची भूमिका सोशल मीडियावरुन मांडली आहे.


हा तर आंबेडकर यांच्या घटनेला विरोध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हा तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेला विरोध,' या मथळ्याखाली उपाध्ये यांनी एक्सवर (आधीचं ट्वीटरवर) पोस्ट केली आहे. "मारकडवाडी सध्या बरेच चर्चेत आहे. शरद पवार गटाच्या पुढाकाराने बॅलेटपेपर वर मतदान घेण्याचे थोतांड करण्यात आले. याचं कौतुक नेहमीच भाजपा-मोदी-फडणवीस द्वेषाच्या तमाशात तुणतुणे वाजवणारे संजय राऊत व अर्बन नक्सल्यांनी केले आहे," असा टोला उपाध्येंनी पोस्टच्या सुरुवातीला लगावला आहे. "आता शरद पवार व राहुल गांधी येथे भेट देऊन परत मागणी करणार असल्याचे शरद पवार गटाचे सांगत आहेत. असा कोणताही प्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेच्या विरोधात असून घटनेचा हा अपमान आहे," असंही उपाध्ये यांनी आपली भूमिका मांडताना म्हटलं आहे.


जनतेला अडाणी कसं समजू शकता?


"बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना प्रत्येक संस्थेला काही जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. निवडणूका घेणे हे निवडणूक आयोगाचेच काम आहे. उद्या मला निकाल मान्य नाही म्हणून कुणी न्यायालय वेगळे सुरू करेल कोणी अजून वेगळे प्रकार करेल. ईव्हीम निकाल तेव्हाच अमान्य होतो जेव्हा भाजपा जिंकतं. उदा लातूर शहरात अमित देशमुख जिंकले, तर ईव्हीम तक्रार नाही मात्र लातुर ग्रामीणमध्ये त्यांचं बंधू हरले व भाजपा जिंकले तर मात्र ईव्हीममध्ये घोळ असतो. असला भंपकपणा जनता ओळखून आहे म्हणूनच विरोधकांना ती महत्व देत नाही," असंही भाजपाच्या मुख्य प्रवक्त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. "परवा मारकडवाडी येथे झालेल्या बॅलेट पेपरवर निवडणुक होणार या नाटकाची कल्पनाही तिथल्या ग्रामस्थांना नव्हती. मुलाखतीत तसं सगळ्यांनी स्पष्ट सांगितलं. म्हणजे महाविकास आघाडीचे नेते ग्रामस्थांना पुढे करून स्वतःच कुठंतरी शिक्के मारत बसणार, आणि ईव्हीम कसं खोटं आहे, हे सिद्ध करणार. जनतेला तुम्ही एवढं अडाणी कसं समजू शकता? याच जनतेनं विचार करून, ठरवून महायुतीला निवडून दिलं आहे," असंही उपाध्ये म्हणाले आहेत. 


अनेक वेळा संधी देऊनही


"अनेक वेळा संधी देऊनही विरोधकांना ईव्हीएम विरोधात एक साधा पुरावा सुध्दा देता आला नाही, कारण मुळात दोष तुमच्या मानसिकतेत आणि विचारधारेत आहे," असं उपाध्ये यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.




खोचक हॅशटॅग


उपाध्ये यांनी या पोस्टच्या शेवटी #मारकडवाडीतले_माकडचाळे, #EVM, #महाभकास_आघाडी, #Election2024, #BallotPaper, #ECI, #ElectionCommision असे हॅशटॅग वापरत विरोधकांवर निशाणा साधला आहे.