Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीत नाशिकच्या चांदवड आणि बीडच्या माजलगाव मतदारसंघात भाऊबंदकीचा वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळतंय.. चांदवडमध्ये डॉ राहुल आहेर यांचा उमेदवारी दिल्याने भाऊ केदा आहेर नाराज आहेत.. तर तिकडे बीडच्या माजलगावात प्रकाश सोळंकेंना उमेदवारी दिल्याने त्यांचे पुतणे जयसिंग सोळंके नाराज झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीवरून कुटुंबांतला वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय.. नाशिकच्या चांदवडमध्ये उमेदवारीवरून आहेर भावांमध्ये वादाची ठिणगी पडलीय... तर बीडच्या माजलगावात सोळंके काका-पुतण्यामध्ये वाद उफाळून आलाय... नाशिकच्या चांदवड मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांनी माघार घेत भाऊ केदा आहेर यांच्या नावाची पक्षाकडे शिफारस केल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.. मात्र भाजपच्या पहिल्या यादीत चांदवड  मतदारसंघातून विद्यमान राहुल आहेर यांचंचं नाव आल्यानं आहेर बंधूंमधल्या वादाला तोंड फुटलंय.. राहुल आहेरांना उमेदवारी दिल्यानंतर 17 नगरसेवकांनी राजीनामे दिलेत.. राहुल आहेर यांनी आपलं नाव पक्षाला सुचवल्याचं फक्त भासवल्याच आरोप केदा आहेर यांनी केलाय. जो भावाचा नाही झाला तो जनतेचं काय होणार असा हल्लाबोल केदा आहेर यांनी आमदार राहुल आहेरांवर केलाय.. 


तर तिकडे बीडच्या माजलगावमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने विद्यामान आमदार प्रकाश सोळंके यांना उमेदवारी दिल्याने पुतण्या जयसिंग सोळंके यांचे समर्थक नाराज झालेत.प्रकाश सोळंके यांनी काही दिवसांपूर्वीच निवृत्तीची घोषणा केली होती.मात्र तरिही पक्षाने त्यांना उमेदवारी दिलीय.. प्रकाश सोळंकेंच्या उमेदवारी नंतर जयसिंग सोळंके यांच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत आपली नाराजी व्यक्त केलीय.. मात्र आपण नाराज नसल्याचं म्हणत जयसिंग सोळंके यांनी वादावर पडदा टाकलाय.


राजकारण आणि सत्ताकारणात नाती गोती आणि भावनांना स्थान नसतं असं म्हटलं जातं. याचा प्रत्येय राज्याच्या राजकारणात आतापर्यंत अनेकदा आलाय.आता चांदवडमधील आहेर बंधुंमधील वाद आणि माजलगावातील काका-पुतण्यामधील शीतयुद्ध यावरून हे पुन्हा एकदा पाहायला मिळतंय.


वडगावशेरीच्या उमेदवारीवरून महायुतीत संभ्रम


वडगावशेरी मतदारसंघावरून महायुतीमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र या यादीत वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना स्थान देण्यात आलं नाही. महायुतीच्या सुत्रानुसार पुणे शहरातील हडपसर आणि वडगाव शेरी या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे. त्यानुसार हडपसरमधून विद्यमान आमदार चेतन तुपे यांना उमेदवारी घोषित करण्यात. मात्र त्याचवेळी सुनील टिंगरे यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालय. असं असलं तरी उमेदवारीसाठीचा ए.बी. फॉर्म आपल्यालाच देण्यात आल्यामुळे आपली उमेदवारी पक्की असल्याचा दावा सुनील टिंगरेंनी केलाय. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण प्रचंड चर्चेत आलं. त्या अपघातावरून जोरदार राजकारणही रंगलं होतं. त्याचाच फटका सुनील टिंगरे यांना बसल्याची चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक हे देखील वडगाव शेरीमधून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.