सोलापुरातील मारकवाडीत नेमकं काय झालं? संपूर्ण देशभरात होतीये चर्चा
सोलापुरातील माळशिरसमध्ये मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला. तसेच ईव्हीएमची सत्यता तपासण्यासाठी थेट मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव केला.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानंतर ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. सोलापुरातील माळशिरसमध्ये मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला. तसेच ईव्हीएमची सत्यता तपासण्यासाठी थेट मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव केला.
माळशिरस विधानसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे आमदार उत्तम जानकर आणि मारकडवाडी इथल्या ग्रामस्थांनी देखील ईव्हीएमवर आक्षेप नोंदवत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी केली. गावामध्ये बूथ देखील लावण्यात आले.. मात्र, सुरुवातीपासूनच जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या प्रक्रियेला बेकायदेशीर ठरवत विरोध केला.
या गावात यापूर्वीच्या दोन निवडणुकात आमदार उत्तम जानकर यांना जास्त मताधिक्य होतं. अगदी 2024 मधील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारापेक्षा राष्ट्रवादी एसपीच्या उमेदवाराला जास्त मतं मिळाली होती. मात्र,नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जानकर याना 843 आणि भाजप उमेदवार राम सातपुते याना 1003 मते पडली. ईव्हीएममुळे मतं दुसरीकडे गेल्याची शंका जानकर समर्थक यांनी व्यक्त केली
इथूनच बॅलेट पेपरवर मतदान घेऊन मतं नेमकी कुठे गेली याचा शोध सुरु झाला. ग्रामस्थांनी 3 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया मत पत्रिकेवर घेण्यासाठी तहसीलदारांकडे मागणी केली . मात्र ही मागणी प्रशासनानं फेटाळली. मागणी फेटाळल्यानंतर आमदार उत्तम जानकर समर्थकांनी कोणत्याही परिस्थितीत मत पत्रिकेवर मतदान घेण्याचा अट्टहास कायम ठेवत मतदान प्रक्रिया सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कारवाईच्या बडग्याच्या इशा-यानंतर मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली.
दुसरीकडे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी ईव्हीएमला बदनाम करण्याचे षडयंत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केल्याची टीका केलीय. मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला असला तरी संपूर्ण राज्यात आणि देशात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मारकवाडी ग्रामस्थांचा प्रयत्नाची चर्चा होतेय.