मुंबई: महाराष्ट्रासह हरयाणा, झारखंड या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा १९ सप्टेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा, आयुक्त अशोक लवासा आणि सुशीलचंद्र मंगळवारी मुंबईत येत आहेत. आयोगाच्या वतीने मंगळवारी आणि बुधवारी सलग दोन दिवस बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. राज्य विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होतोय, याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. 


आता केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त आणि अन्य दोन आयुक्त मुंबईत येऊन दोन दिवस संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणूक तयारीची माहिती घेणार आहेत. गृहविभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांचीही बैठक घेऊन निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली जाईल याबाबतचा आढावा घेतला जाईल.


सूत्रांच्या माहितीनुसार, हरयाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना सर्वात आधी जाहीर होईल. तर झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी अनेक टप्प्यांत मतदान होण्याची शक्यता आहे.


२०१४ मध्ये महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम २० सप्टेंबर रोजी जाहीर झाला होता. तर १५ ऑक्टोबरला मतदान झाले होते. 


दरम्यान, शिवसेना-भाजप युतीची घोषणाही याच दिवशी होण्याची शक्यता आहे. १९ सप्टेंबरला नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह उपस्थित राहणार आहेत. यावेळी युतीची घोषणा होऊ शकते.