कुठलीच रिस्क नको म्हणून पुण्यात भाजपचा सेफ गेम! यादीत नाव नसलेले `हे` आमदार मात्र टेन्शनमध्ये
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत पुण्यातील महत्वाच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, यादीत नाव नसलेल्या आमदारांची धाकधुक वाढली आहे.
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं पुण्यात विद्यमान तीन आमदारांना पुन्हा एकदा संधी दिलीय. भाजपनं सुरक्षित मतदारसंघातील अपेक्षित उमेदवार जाहीर केलेत. कसब्यात ब्राह्मण की ब्राह्मणेतर उमेदवार द्यायचा, खडकवासला आणि वडगावशेरीपैकी कोणत्या मतदारसंघाची मित्रपक्षाबरोबर अदलाबदली करायची. या पेचामुळे मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा लांबणीवर पडलीय.
कोथरूड,शिवाजीनगर आणि पर्वती मतदारसंघात इतर इच्छुकांनी उमेदवारीसाठी दंड थोपटलेले असताना पक्षांनं यावेळी कुठलीच रिस्क नको म्हणत विद्यमानांना उमेदवारी दिलीय. कोथरूडमधून विद्यमान आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटलांना सलग दुस-यांदा उमेदवारी देण्यात आलीय. शिवाजीनगरमधून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळेंना सलग दुस-यांदा संधी देण्यात आलीय पर्वतीतून माधुरी मिसाळांना तर सलग चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आलीय.
शहरातील दोन विद्यमान आमदारांवर मात्र वेट अँड वॉचची वेळ आलीय. खडकवासला मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार होण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या भीमराव तापकिरांचं नाव पहिल्या यादीत नाहीये. त्याचवेळी कॅन्टोन्मेंटचे विद्यमान आमदार सुनील कांबळे यांना देखील पहिल्या यादीत संधी मिळालेली नाहीये. या दोन्ही जागांबाबत महायुतीतील जागावाटपात काही फेरबदल होणार आहेत का?, असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भीमराव तापकीर यांचा खडकवासला मतदार संघातून जेमतेम दीड हजार मतांनी विजय झाला होता. तर सुनील कांबळे यांना कॅन्टोन्मेंटमधून जेमतेम 5 हजार मतांची आघाडी होती. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत तर कॅन्टोन्मेंटमधून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या पेक्षा जास्त मतं पडली होती. ही आकडेवारी या दोघांची चिंता वाढवण्यास कारणीभूत ठरली असण्याची शक्यता आहे.
आता राहिला प्रश्न कसबा, वडगाव शेरी आणि हडपसरचा. या तीन मतदारसंघापैकी वडगाव शेरी आणि हडपसरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे त्या जागांचा विचार भाजपकडून केला गेला नसल्याची शक्यता आहे. जागावाटपाच्या सूत्रामध्ये काही बदल झाला तरच उमेदवारीचा मुद्दा समोर येतो. कसब्याच्या बाबतीत मात्र भाजप जरा जास्तच सावधगिरी बाळगताना दिसतोय. भारतीय जनता पक्षाचा वर्षानुवर्ष गड राहिलेला कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या ताब्यात गेला.
याही वेळी काँग्रेसकडून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. भाजपकडून पुन्हा एकदा हेमंत रासने लढण्याच्या तयारीत असले तरी दिवंगत खासदार गिरीश बापट आणि दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांबरोबरच शहराध्यक्ष धीरज घाटे यांची नावे चर्चेत आहेत. कसब्यामध्ये गेल्या वेळेची चूक टाळण्याचा यावेळी भाजपचा स्वाभाविक प्रयत्न असणार आहे.