Maharashtra Assembly Elections 2024 :  महायुती सरकारनं त्यांच्या अडीच वर्षांच्या कामाचा लेखाजोखा मांडणारं रिपोर्ट कार्ड जनतेसमोर सादर केलं. यावेळी शिंदे फडणवीस आणि अजित पवारांनी त्यांनी घेतलेल्या निर्णयांची यादीत जनतेसमोर मांडली. विरोधक नकारात्मक भावनेतून प्रचार करत असून जनता त्यांना थारा देणार नाही असा दावा महायुतीच्या नेत्यांनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना महायुती सरकारनं गेल्या अडीच वर्षांचं केलेल्या कामांचं रिपोर्ट कार्ड जनतेसमोर सादर केलं.महायुतीचं सरकार सामान्यांचं सरकार असून त्यांनी कॉमन मॅनला सुपर मॅन करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय. पराभव समोर दिसू लागल्यानं विरोधक उलटसुलट आरोप करत सुटल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. लाडकी बहीण योजनेला टच केल्यास तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार असल्याचा इशाराही एकनाथ शिंदेंनी दिलाय.. 


महायुती सरकारनं लोकहिताचे 900 निर्णय घेतल्याचा दावा करण्यात आलाय. महायुती सरकार हे काम करणारं सरकार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय. केलेल्या कामांच्या जोरावर पुन्हा जनतेकडं कौल मागणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय.


शेतकऱ्यांसाठी मोफत वीज देण्याची सरकारनं घोषणा केली. शेतकऱ्यांसाठी वीज कंपनी स्थापन करणारं  महाराष्ट्र पहिलं राज्य असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. विरोधक फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम करतात. उद्योग आणि परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र गुजरातच्या पुढं आहे. तरीही विरोधक गुजरातचं गुणगाण गात असल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय.


महायुतीच्या रिपोर्ट कार्डवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं टीका केलीय. महायुतीच्या रिपोर्ट कार्डचं नाव डिपोर्ट कार्ड ठेवायला हवं असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय.  रिपोर्ट कार्ड सादर करुन महायुतीनं जनतेसमोर आपल्या कामाचा लेखाजोखा मांडलाय. हे रिपोर्ट कार्ड जनतेला पसंत पडलंय का याचा फैसला येत्या 23 नोव्हेंबरला होणार आहे.