महायुतीत महाभारत ! एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला शिवसेनेचा पहिला उमेदवार
रामटेक मतदारसंघाचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. जयस्वालांच्या पक्ष प्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलीय. शिंदेंच्या घोषणेनंतर रामटेक मतदारसंघात महायुतीत महाभारत सुरू झालंय..
Maharashtra assembly Elections 2024 : महाराष्ट्राच्या महासंग्रामाला प्रारंभ झालाय.. कारण विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय... लोकशाहीतल्या सर्वोच्च महोत्सवाची घोषणा झालीय... महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे.. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे.. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान पार पडेल तर 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा महानिकाल लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे.
महायुतीत रामटेकची जागा कोण लढवणार? यावरून खलबतं सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर करून धक्का दिलाय. अपक्ष उमेदवार आशिष जैयस्वाल यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांची उमेदवारीही जाहीर झालीय. मुख्यमंत्र्यांनी उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झालीय. युतीधर्म न पाळणाऱ्या आशिष जयस्वाल यांना उमेदवारी का दिली ?असा सवालही भाजपचे पदाधिका-यांनी विचारलाय.
2019 च्या निवडणुकीत युती धर्माचं पालन न करता आशीष जयस्वाल यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र,यावेळी महायुतीकडून त्यांना उमेदवारी देण्यास स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा विरोध होता. जयस्वाल यांची उमेदवारी कायम राहिल्यास प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामे देणाचा इशाराही भाजप पदाधिकाऱ्यांनी दिलाय. येत्या गुरूवारी भाजप कार्यकर्त्यांनी बैठक बोलावण्यात आहे. या बैठकीत भाजप पदाधिकारी पुढील निर्णय घेण्याची शक्यता आहे. एकूणच एकनाथ शिंदे यांनी जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजप आणि शिंदे शिवसेनेत रामटेकमध्ये वादाची ठिणगी पडलीय.
गोंदियातील मोरगाव-अर्जुनी विधानसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केलाय. मागील निवडणुकीत 718 मतांनी पराभव झालेले माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले हे या मतदारसंघातून इच्छुक आहेत. महायुतीत ही जागा भाजपलाच सुटणार, असा दावाही राजकुमार बडोलेंनी केलाय .