महाराष्ट्रात सरकार बदलणार? मनसेची सत्ता आणि फडणवीस मुख्यमंत्री? राज ठाकरे यांचे सूचक वक्तव्य
Raj Thackeray Devendra Fadnavis Meeting : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
Maharashtra Assembly Elections 2024 : लोकसभेमध्ये भाजपला पाठिंबा देणा-या राज ठाकरे यांची मनसे विधानसभेमध्ये स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.. मात्र, पुढच्या सरकारमध्ये फडणवीस हे मुख्यमंत्री आणि सत्तेत मनसे असणार असल्याचं विधान राज ठाकरेंनी केलंय. त्यामुळे मनसे आणि भाजपची जवळीक वाढल्याची चर्चा वाढलीये.. आणि यावरूनच राजकारण तापलंय..
राज ठाकरेंनी पुढच्या सरकारचे फडणवीस मुख्यमंत्री आणि मनसे सत्तेत असेल असं वक्तव्य करुन महायुतीत संशयकल्लोळ निर्माण केलाय. राज ठाकरेंच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागलेत. भाजपला शिवसेना डोईजड वाटू लागल्यानं भाजप आणि मनसेची जवळकी वाढली आहे का असा सवाल उपस्थित केला जाऊ लागलाय. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर भाजपनंही अतिशय सावध प्रतिक्रिया दिलीय राज ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांनी खुबीनं प्रतिक्रिया देण्याचं टाळलंय. हिंदुत्वाच्या मुद्यावर राज ठाकरे एकत्र आलेत, त्यामुळं ते असं बोलले असावेत असं फडणवीस म्हणालेत.
राज ठाकरेंना महाराष्ट्राचे शत्रू हे महाराष्ट्राचे तारणहार वाटू लागल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय. राज ठाकरेंनी फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा बोलून दाखवलीय. फडणवीस-ठाकरे जवळीकीमुळं अजितदादा आणि शिवसेनेच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली नाही ना अशी चर्चा सुरु झालीय.
दरम्यान, शिवसेना UBT पक्षानं राज ठाकरेंचे पुत्र आणि मनसेचे माहीममधील उमेदवार अमित ठाकरेंविरोधात तक्रार केली आहे. मनसेकडून आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याची तक्रार, शिवसेना UBTचे खासदार अनिल देसाई यांनी, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलींगम यांच्याकडे केली आहे. शिवाजी पार्कवर मनसेच्या बॅनरखाली दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्याला अमित ठाकरे उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च, अमित ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करायची मागणी करण्यात आली आहे. तसं निवदेनंही शिवसेना UBTनं दिलंय. यावरुन मनसे आणि शिवसेनेनं टीकेची झोड उठवलीये.