Maharashtra Assembly Elections 2024 : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण बाळासाहेबांचा असल्याचं सांगत राज ठाकरेंनी एका नव्या चर्चेला तोंड फोडलंय. गेल्या काही वर्षांत सुरु असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावरुन राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा खरपूस भाषेत समाचार घेतला.  धनुष्यबाण हा उद्धव ठाकरेंचा नाही असं राज ठाकरे म्हणाल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चांगलंच जिव्हारी लागलंय. राज ठाकरेंच्या टीकेला ठाकरे समर्थकांनीही सडेतोड उत्तर दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरेंनी शिवसेना फोडली होती असा टोला आदित्य ठाकरेंनी झी 24 तासच्या प्रचारसभेत लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही राज ठाकरेंच्या आरोपांना उत्तर दिलंय. शिवसेना आणि धनुष्यबाण गहाण होता तो आम्ही मुक्त केल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केलाय. अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष पळवल्याचा आरोप केला होता. राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांचाच असल्याचं ते म्हणाले होते. राज ठाकरेंच्या या आरोपांना फारसं गांभीर्यानं घेत नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणालेत. 
ऐन निवड़णुकीत राज ठाकरेंनी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ओरिजनल मालक कोण हा प्रश्न उपस्थित केलाय. याचा फायदा राज ठाकरेंनी किती होईल सांगता येणारक नाही पण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी थोडी सहानुभूती मात्र हमखास मिळणार आहे.


दरम्यान, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी या आठवड्याच्या अखेर म्हणजे 8 नोव्हेंबरला निर्णय येणार आहे. पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं याचिका दाखल केली होती. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड त्यांच्या निवृत्तीच्या आधी निकाल देणार आहेत. 10 नोव्हेंबरला सरन्यायाधीश निवृत्त होत आहेत. त्याआधी 8 नोव्हेंबरला त्यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी ते निकाल देतील. मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणावर सुनावणी झालेली नाही. त्यामुळे आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी सरन्यायाधीश चंद्रचूड काय महत्त्वाचे निर्देश देणार याकडे लक्ष लागलंय. दरम्यान न्याय देवतेच्या डोळ्यांवरची पट्टी उघडली आहे त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया यावर शिवसेना UBTचे नेते अनिल परब यांनी दिली.