यंदाची निवडणूक देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय करिअरचा टर्निंग पॉईंट ठरणार? सलग सहाव्यांचा विजयी होणार का?
Devendra Fadnavis : 1999 ते 2019 सलग पाच वेळा देवेंद्र फडणवीस निवडून आले. आता सहाव्यांदा ते विजयी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India Press Conference) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. सलग पाचवेळा विधानसभा निवडणूक जिंकणारे देवेंद्र फडणवीस विजयाचा
षटकार ठोकण्यास सज्ज झालेत. फडणवीसांसाठी हा सामना खूप सोपा असला तरी विधानसभा निवडणुकीची मॅच जिंकण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. राज्यातील भाजपचे सरसेनापती फडणवीस क्रिकेटर धोनीसारखा विजयी षटकार ठोकून निवडणुकीचा सामना जिंकून देतात का याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झालीय.
देवेंद्र फडणवीस आमदारकीचा षटकार ठोकण्यासाठी नागपूरच्या रणमैदानात उतरलेत. सलग पाचवेळा नागपुरातून निवडून आलेले फडणवीस सहाव्या वेळी मैदान मारण्यासाठी सज्ज झालेत. देवेंद्र फडणवीसांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग पाच वेळा देवेंद्र निवडून आले आहेत. आता सहाव्यांदाही सहज विजय मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी निघालेल्या रॅलीत देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री असतील अशा आशयाच्या घोषणा दिल्या गेल्या. फडणवीसांनी राज्याच्या राजकारणात प्रवेश केल्यानंतर सातत्यानं एक एक पायरी वर चढत थेट मुख्यमंत्रिपदाला गवसणी घातली होती. 2019मध्ये त्यांना मुख्यमंत्रिपदानं हुलकावणी दिली. यावेळी मात्र मुख्यमंत्रीपद पक्कं असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.
नागपूरचा विजय फडणवीसांसाठी अगदी सोपा आहे. सत्तेच्या मॅचमध्ये आमदारकीचा सिक्सर फडणवीस सहज ठोकतील. पण महाराष्ट्राच्या सत्तेची फायनल मॅच त्यांना जिंकायचीय. फडणवीसांचा षटकार धोनीच्या षटकारसारखा असावा अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. दुसरीकडं त्यांचे नागपुरातील विरोधक प्रफुल्ल गुडधेंनी फडणवीसांना जोरदार टक्कर देण्याचा निर्धार केलाय.
फडणवीसांसाठी 2014चा सामना खूपच लकी ठरला होता. थेट मुख्यमंत्रिपदाचा मुकूट फडणवीसांनी परिधान केला होता. आता बरोब्बर दहा वर्षानंतरची निवडणूक फडणवीसांच्या राजकीय करिअरचा टर्निंग पॉईंट ठरणार का याची उत्सुकता निर्माण झालीय.