Maharashtra Assembly Elections 2024 :  विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार संपलाय. निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांना आजमावून झाल्यानंतर आता उमेदवार आणि कार्यकर्त्यांचं मुख्य काम सुरु झालंय. जाहीर प्रचार संपल्यानंतरचे 48 तास अतिशय महत्वाचे आहेत. या 48 तासांत मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला जाणार आहे. उमेदवार आता गावोगावी फिरतील. गावकीच्या प्रमुखांची आणि कुटुंबातील ज्येष्ठांची भेट घेतील. ठिकठिकाणी चुहामिटिंग सुरु होतील. या चुहामिटिंगमध्ये ईव्हीएमचं कोणतं बटन दाबायचं हे ठरेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गावोगावच्या पुढाऱ्यांसाठी हे 48 तास महत्वाचे असतात. मोठंमोठे कुटुंबातील जेष्ठ नागरिक उमेदवारासमोर आपल्या खासगी मागण्या मांडतात. या मागण्या रस्ते, वीज पाणी यापेक्षा वेगळ्या असतात. त्यामुळं या मागण्या जाहीर मांडण्याऐवजी खासगी बैठकांमध्ये मांडण्यात येतात.


तारेवरच्या मतदारांना आपल्याकडं खेचून आणण्यासाठी 48 तासांसारखा दुसरा वेळच नसतो. तारेवरच्या मतदारांची यादी कार्यकर्ते उमेदवारांकडं दिली जाते. कधी-कधी तर संपूर्ण गावं किंवा तांड्यांवरील मतदारांची यादी उमेदवारांकडं जाते. मतदारांच्या प्रमुखांसोबत बैठका होतात या बैठकीत शपथ आणि बेलभंडारा मतदारांच्या हाती दिला जातो. एवढंच नव्हे तर मतदारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांची नेमणूकही केली जाते.


मतदान तुम्हालाच करणार अशी वचनं या बैठकीत घेतली जातात. यासाठीची सगळी तजवीज तिथल्या तिथं केली जाते. मग कुलदैवताच्या नावानं शपथा घातल्या जातात. काही ठिकाणी हातात बेलभंडारा दिला जातो. हे गावोगावी अगदी बिनबोभाटपणं सुरु असतं.


शहरी मतदारांमध्येही आता वेगवेगळे ट्रेंड्स दिसू लागलेत. शहरांमध्ये सोसायट्या, चाळींच्या कमिट्या असतात. सोसायट्यांचे सेक्रेटरी आणि कमिट्यांचे अध्यक्ष यांच्याशी उमेदवार संधान साधतात. सोसायटीतली, चाळीतली मतदारसंख्या सांगितली जाते. त्यानुसार त्यांना शिर्डी, एकवीरा, पंढरपूर अशा यात्रा घडवल्या जातात. उच्चभ्रू सोसायटीतील मतदारांना वॉटरपार्कच्या सहलीही घडवल्या जातात. शहरी मतदारांच्या मागण्या वेगवेगळ्या असतात. सगळंकाही करुनही मतदानाची हमी मिळत नाही. पण उमेदवार हा जुगारही खेळताना दिसतात.


मतदारांसाठी काहीही अशी भावना उमेदवारांची असते. निवडणुकीनंतरच्या पाच वर्षांत जिंकलेला किंवा पराभूत उमेदवार भेट देणार नाही. पण 48 तासांत देव भक्तांच्या भेटीला धावून येतो या उक्तिनं भावी आमदार आपल्या मतदाराचे रुसवेफुगवे काढताना दिसतात. शेवटी काय 20 नोव्हेंबरला या उमेदवारांचे भवितव्य ठरणार असून त्याचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे.