Maharashtra Assembly New Opposition Leader: मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाने तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर आता विरोधी पक्षनेतेपदी कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट सरकारमध्ये सहभागी झाल्याने आमदार संख्येचे आधारे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे देण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी घेतला. मात्र पावसाळी अधिवेशन सुरु होऊन एक आठवडा उलटला तरी विरोधी पक्ष नेता कोण याचं उत्तर मिळालेलं नव्हतं. अखेर महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता मिळाला आहे.


कोणावर सोपवण्यात आली जबाबदारी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेता पदी नियुक्ती केली आहे. तर विधिमंडळ पक्षनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. मागील 2 आठवड्यांपासून विरोधी पक्षनेते पदाचा उमेदवार कोण हे ठरत नव्हतं. मात्र 2 आठवड्यांनंतर अखेर विरोधी पक्षनेते पदाच्या नावावरील पडदा उठला आहे. दिल्लीमधून हा निर्णय घेण्यात आलंचं सांगितलं जात आहे. आज हायकमांडने महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. यासंदर्भात आता काँग्रेस पक्षाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पक्षाच्यावतीने पत्र पाठवून या नियुक्तीबद्दल कळवलं जाईल. यानंतर नियुक्तीबाबतच्या पुढील प्रक्रिया सुरु होतील असं सांगण्यात आलं आहे.  


काँग्रेसमध्ये सुरु होणार रस्सीखेच


दरम्यान, वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतापदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष पदावरुन वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचा महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष बदलणार का अशी चर्चा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये दबक्या आवाजामध्ये सुरु आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे सध्या काँग्रेसकडील दोन्ही महत्त्वाची पदं म्हणजेच विरोधी पक्षनेता पद आणि प्रदेशाध्यक्ष पद हे पूर्व विदर्भातील नेत्यांना देण्यात आलं आहे. राज्यातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. ते ही पूर्व विदार्भातून येतात. त्यामुळे आता दोन्ही पदं पूर्व विदर्भात ठेवली जाणार की प्रदेशाध्यक्ष बदलणार यासंदर्भातील चर्चा सुरु झाली आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उत्सुक आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र काँग्रेसमधील इतर नेतेही प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे या पदासाठी चढाओढ वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशोक चव्हाण हे गांधी कुटुंबियांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र मागील काही काळापासून ते नाराज असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात होती. त्यामुळेच आता काँग्रेसच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष पदाबाबतच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.