Exclusive:`महाराष्ट्रात चिखल झालाय त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच!`, राज ठाकरेंनी सर्वच उलगडून सांगितलं
Raj Thackeray on Uddhav Thackeray: स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचं म्हणून त्यांनी जनतेच मतदान नाकारुन काँग्रेसशी बस्तान बांधलं, अशी टीका राज ठाकरेंनी केली.
Raj Thackeray on Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झी 24 तासला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण, योजना, विधानसभा निकाल, उद्धव ठाकरे या सर्वांवर भाष्य केले. महाराष्ट्राच्या राजकारणाचा आज जो चिखल झालाय, या सर्वाला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याची टिका राज ठाकरे यांनी केली. स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचं म्हणून त्यांनी जनतेच मतदान नाकारुन काँग्रेसशी बस्तान बांधलं. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली, असे राज ठाकरे म्हणाले.
'स्वत:ला मुख्यमंत्री व्हायच म्हणून भाजपशी सौदा'
आपली विचारप्रणाली सोडून दुसऱ्याच्या विचारप्रणालीत बसायचं, त्यानेही ती गोष्ट स्वीकाराचं, अशी गोष्ट मी कधी पाहिली नाही. माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर मी त्याच दिवशी दुकान बंद करेन असे बाळासाहेब म्हणाले. पण यांनी त्यांच्याच बाजुला दुकान मांडलं. त्यांनी बाळासाहेबांच्या नावाच्या आधीचं हिंदुह्रदयसम्राट काढून टाकलं, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टिका केली. उद्धव ठाकरेंच्या व्यक्तिगत महत्वकांक्षेतून हे झालं. मला स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचंय यासाठी भाजपशी सौदा गेला. मोदी, अमित शहा वेगवेगळ्या सभेत आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे सांगत होते, त्यावेळी का आक्षेप घेतला नाही.
'महाराष्ट्रात चिखल झालाय त्याला कारण उद्धव ठाकरे'
महाराष्ट्रात जो चिखल झालाय, त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच आहेत. सुरुवातीला तुम्ही शरद पवारांशी बोलायला सुरुवात केली. अजित पवारांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणार तुरुंगात टाकणार होते, त्यांच्यासोबत तुम्ही शपथविधी करता. इतक्या स्वार्थाने तुम्ही विचारप्रणालीला मागे सारले. लोकांनी मत दिले त्याला लाथाडले. याची जर महाराष्ट्राला चटक लागली तर राजकारण कुठे जाईल? उद्या या गोष्टी वाढल्या तर कोण राहीलं इथे? असे ते म्हणाले.
Exclusive: 'फुकट दिल्याने लोक ओशाळतात', लाडकी बहीण' योजनेवर काय म्हणाले राज ठाकरे?
'बंड आधीच झालं असतं पण कोरोनामुळे...'
शिंदेंनी जी गोष्ट केली ती अत्यंत योग्य केली. कारण तुम्ही विचारप्रणाली, बाळासाहेब सर्वांना बाजुला काढलं. त्यांची वैयक्तिक महत्वकांक्षादेखील असेल. काँग्रेससोबत जाऊन बसणं हे कोणालाच पटलं नसेल. इतकी वर्षे ज्यांना विरोध केला त्यांच्यासोबत सत्तेत बसणे हे कोणालाच आवडले नाही. ही गोष्ट आधीच झाली असती पण मध्ये कोविड आला, असे राज ठाकरे म्हणाले.
'आमच्या आमदारांची गरज लागेल'
राजकारणात काही गोष्टींच्या सीमा आपण आखल्या पाहिजेत. तुम्ही एखाद्या पक्षाचे नाव आणि चिन्ह काढून घेता कामा नये. पॉलिटीकल एथिक्स नावाची गोष्ट असते की नाही? की आपल्याला सर्वच गुंडाळून टाकायचं? असा प्रश्न त्यांनी विचारला. मला पटत नाहीत त्या गोष्टी शिंदेंकडून झाल्या असतील. पण तो माणूस दिलदार मनाचा आहे, असे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे कॉम्बिनेशन मस्त आहे. भाजप-शिंदे सत्तेत येतील पण त्यांना आमच्या आमदारांची गरज लागेल, असे राज ठाकरे म्हणाले.
'मी केलं ते योग्यच'
बाळासाहेबांना त्रास देऊन मला कोणती गोष्ट करायची नव्हती. मी केलं ते योग्य केलं. बाळासाहेब सोडून मी कोणाच्या नेतृत्वात काम करु शकत नाही, असे ते राज ठाकरे म्हणाले.