Raj Thackeray Interview: विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झी 24 तासला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. आज महाराष्ट्रात ज्या प्रकारचे राजकारण सुरु आहे, तेव्हा तीच माणसं जर निवडून आली तर आमचं कोणी वाकडं करु शकत नाही, हे त्यांच्या मनात दृढ होईल. मतदारांची प्रतारणा होईल. पण या सर्वाला पर्याय हवाय. मला महाराष्ट्राची चिंता आहे. एखादा पक्ष संपला तरी चालेल पण महाराष्ट्र संपला नाही पाहिजे, असे ते म्हणाले. झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या 'टू द पॉइंट' मुलाखतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
1952 साली जनसंघ सुरुवातीपासून आमच्या हातात सत्ता द्या सांगत होते. 1980 साली त्याचं नाव भारतीय जनता पार्टी हे नाव झालं. 1984 साली त्यांचे 2 खासदार आले. 1989 साली 92 खासदार निवडून आले. संपूर्ण बहुमत त्यांना 2014 साली मिळालं. 1966 साली शिवसेनतून बाळासाहेब ठाकरेही मला सत्ता द्या हेच सांगत होते. 1995 साली शिवसेनेला सत्ता मिळाली. परिस्थिती तीच राहत नाही, बदलत राहते. राजकीय उलाढाल होत असते.इथे थांबून चालत नाही. जमिनीत पाय खोल रोवून उभे राहावे लागते, असे राज ठाकरे म्हणाले.
जे वेगवेगळ्या प्रकारचं जेवण जेवतात, त्यांच्या स्वाभीमानाच्या गोष्टी वेगळ्या असतात. इतर राज्यात स्वाभीमानाच्या गोष्टी आहेत तशा महाराष्ट्रातही हव्यात. महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवरायांच्या नावाखाली एकत्र येतो. पण राजकारण्यांनी जनतेला जाती-पातीतही विभागून टाकलंय. वेगेवेगळ्या राज्यातील पक्ष त्यांची अस्मिता सोडत नाही. महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जातायच पण त्याने फार फरक पडत नाही. महाराष्ट्र प्रगत आहेत. पण महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी उद्योगधंदे कसे खेचून आणतायत आणि इथल्या स्थानिकांना कसं प्राधान्य देतायत, हे महत्वाचे आहे.
महाराष्ट्रात लाडकी बहीण सारखी योजना आहे, ज्यात महिलांना 1500 रुपये देण्यात येतायत. अनेक योजना आहेत, ज्यात मोफत निधी लोकांना दिला जातो. यावर राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. फुकट दिल्याने लोक त्यांना ओशाळतात. यातून ना मला काही मिळणार ना पुढच्या पिढीला काही मिळणार. याचा राग जनतेने मतदानातून व्यक्त करायला हवा, यांचे पॅकेज, थापा यावर प्रश्न विचारणारा सुज्ञ मतदार तयार झाला पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर पैसे फेकणे, भांडीकुंडी वाटतात. मी लोकांना सांगतो हे घ्या पण त्यांना मतदान करु नका.
लाडकी बहीण योजना पुढे सुरु राहीली तर ते गिफ्ट ठरेल. नाही सुरु राहिली ती लाच ठरेल. नितीन गडकरी यांनीदेखील यावर चिंता व्यक्त केली. या सर्वातून राज्यावर बोजा न येते कशा दिल्या जाणार हे सांगावं, असे ते म्हणाले.
आपली विचारप्रणाली सोडून दुसऱ्याच्या विचारप्रणालीत बसायचं, त्यानेही ती गोष्ट स्वीकाराचं, अशी गोष्ट मी कधी पाहिली नाही. माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर मी त्याच दिवशी दुकान बंद करेन असे बाळासाहेब म्हणाले. पण यांनी त्यांच्याच बाजुला दुकान मांडलं. त्यांनी बाळासाहेबांच्या नावाच्या आधीचं हिंदुह्रदय सम्राट काढून टाकलं, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टिका केली. उद्धव ठाकरेंच्या व्यक्तिगत महत्वकांक्षेतून हे झालं. मला स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचंय यासाठी भाजपशी सौदा गेला. मोदी, अमित शहा वेगवेगळ्या सभेत आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे सांगत होते, त्यावेळी का आक्षेप घेतला नाही. महाराष्ट्रात जो चिखल झालाय, त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच आहेत. सुरुवातीला तुम्ही शरद पवारांशी बोलायला सुरुवात केली. अजित पवारांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणार तुरुंगात टाकणार होते, त्यांच्यासोबत तुम्ही शपथविधी करता. इतक्या स्वार्थाने तुम्ही विचारप्रणालीला मागे सारले. लोकांनी मत दिले त्याला लाथाडले. याची जर महाराष्ट्राला चटक लागली तर राजकारण कुठे जाईल? उद्या या गोष्टी वाढल्या तर कोण राहीलं इथे? असे ते म्हणाले.
शिंदेंनी जी गोष्ट केली ती अत्यंत योग्य केली. कारण तुम्ही विचारप्रणाली, बाळासाहेब सर्वांना बाजुला काढलं. त्यांची वैयक्तिक महत्वकांक्षादेखील असेल. काँग्रेससोबत जाऊन बसणं हे कोणालाच पटलं नसेल. इतकी वर्षे ज्यांना विरोध केला त्यांच्यासोबत सत्तेत बसणे हे कोणालाच आवडले नाही. ही गोष्ट आधीच झाली असती पण मध्ये कोविड आला, असे राज ठाकरे म्हणाले.
काही गोष्टींच्या सीमा आपण आखल्या पाहिजेत. तुम्ही एखाद्या पक्षाचे नाव आणि चिन्ह काढून घेता कामा नये. पॉलिटीकल एथिक्स नावाची गोष्ट असते की नाही? की आपल्याला सर्वच गुंडाळून टाकायचं? असा प्रश्न त्यांनी विचारला. मला पटत नाहीत त्या गोष्टी शिंदेंकडून झाल्या असतील. पण तो माणूस दिलदार मनाचा आहे, असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे कॉम्बिनेशन मस्त आहे. भाजप-शिंदे सत्तेत येतील पण त्यांना आमच्या आमदारांची गरज लागेल, असे राज ठाकरे म्हणाले.