Eknath Shinde on Modi: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुरत कोर्टाने मोदी आडनावाचा उल्लेख करत केलेल्या टिप्पणीत दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेतही (Vidhan Sabha) उमटले आहेत. सभागृहाबाहेर राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राहुल गांधींच्या विधानावर निवेदन देताना खडे बोल सुनावले आहेत. विरोधकांच्या गदारोळात एकनाथ शिंदे यांनी निवेदन देत कारवाई करायची असेल तर गेल्या आठ महिन्यांपासून आमच्याविरोधात घोषणा देणाऱ्या, अपमान करणाऱ्यांवरही कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे.


एकनाथ शिंदे काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"सभागृहाच्या बाहेर जे काही झालं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आहे. काल विषय झाला होता. पण पंतप्रधानांचा अपमान करणं हा संपूर्ण देशाचा अपमान आहे. तसंच गेल्या आठ महिन्यांपासून माझे फोटो लावून अपमान करणं, खोके, चोर, मिंधे म्हणणं हे कोणत्या आचारसंहित बसतं. आम्ही जोडे मारण्याचं समर्थन केलेलं नाही. सावकरांचा वारंवार अपमान करणं हादेखील देशद्रोहच आहे. त्यामुळे आपण जेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा तीन बोटं आपल्याकडे असतात. या सभागृहाचं पावित्र्य जपा अशी माझी विनंती आहे," असं एकनाथ शिंदे काँग्रेस नेते नाना पटोले यांना उद्देशून म्हणाले. 


"आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्ही बोलू शकत नाही असं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाची किर्ती संपूर्ण जगभरात पोहोचवण्याचं काम केलं आहे. मी वैयक्तिक म्हणून बोलत नाही," असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान यानंतर विरोधकांनी गदारोळ करत घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आक्रमक होत आपल्याला बोलू द्यावं अशी विनंती केली. 


पुढे ते म्हणाले की "देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आम्हीच काय, तर देशातील जनताही सहन करणार नाही. जी-२० विषयी बोलताना तुमचे नेते लोकशाही धोक्यात असं म्हणाले. 
वस्तुस्थिती लोकांसमोर जावी यासाठी मी बोलत आहे. लोकशाही नव्हती तर मग यांनी भारत यात्रा कशी काढली? काश्मीरमध्ये तिरंगा कसा फडकवला? तुमच्या नेत्याबद्दल आम्ही कधीही अपमानास्पद बोलत नाही. आम्ही इंदिरा गांधीचा मान राखतो. पण जर तुम्ही आमच्या पंतप्रधानांविरोधात बोलणार असाल तर आम्ही सहन करणार नाही". 


"बाळासाहेब थोरात तुम्ही देशाचा अपमान बाहेर परदेशात केला तर कोण सहन करणार. सभागृहाचा मान राखला पाहिजे. तुम्ही वारंवार सावरकरांचा अपमान केला तर कोण सहन करणार," असा संताप एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसंच सभागृहात बोलताना सर्वांनी तारतम्य बाळगलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. 



"विधानभवनाच्या आवारात गेली आठ महिने आमच्या विरोधात घोषणा केल्या तेव्हा आम्ही काय म्हटले का? तुम्हाला ते सर्व चालतं. आम्ही समर्थन करत नाही. आईचं निधन झाल्यानंतर अंत्यविधी केल्यावर कर्तव्यावर गेलेल्या पंतप्रधानांना तुम्ही चोर म्हणता. नसानसात देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती भरली आहे त्यांचा तुम्ही अपमान करता हे चालणार नाही," असं एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या गदारोळात सांगितलं. कारवाई करायची असेल तर आमच्याविरोधात घोषणा देणाऱ्यांवरही झाली पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी केली.