राज्य सरकार लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची (Chatrapati Shivaji Maharaj) वाघनखं आणणार आहे. मात्र प्रत्यक्षात ही वाघनखं महाराजांनी अफजल खानाच्या (Afzal Khan) वधावेळी वापरली असल्याचा कोणताच पुरावा नसल्याचं स्पष्टीकरण लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिलं आहे. यानंतर राज्य सरकारवर टीका होत असताना सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी यावर निवेदन देत स्पष्टीकरण दिलं आहे. विधानसभेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरल्याचा दावा कुणीही केलेला नाही असं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"अफजल खान कबरीचे अतिक्रमण आम्ही हटवले. शिवभक्तांनी आमच्याकडे वाघनखं आणण्याबाबत मागणी केली. आम्ही ब्रिटन सरकार, म्युझियमशी पत्रव्यवहार केला. आम्हाला पुरावे दिले गेलेत. व्हिक्टोरीया म्युझियमला ही वाघनखं देण्यापूर्वी त्याचे प्रदर्शन केले होते. त्याच्या बातम्याही दिल्या आहेत. म्युझियमने ती वाघनखं महाराजांची आहेत असा दावा केलेला नाही. एक वर्षासाठी वाघनखं देऊ असं त्यांनी सांगितलं होतं, पण आपल्या प्रयत्नांमुळे तीन वर्ष राहतील असं ठरलं," अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. 


"19 तारखेला ही वाघनखं साता-यातील सरकारी म्युझिअममध्ये ठेवली जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे वंशज यांच्या उपस्थितीत ही वाघनखं दर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. यासह शस्त्रास्त्र दालनाचं उद्घाटनही 19 तारखेला होणार आहे. याचं मी सर्वांना निमंत्रण देत आहे,"असंही त्यांनी सांगितलं. तसंच इतके इतिहासकार, संशोधक असताना फक्त एका एका इतिहासकारानेच यावर आक्षेप घेतला असंही म्हटलं. 


पुढे ते म्हणाले की, "य़ा संवेदनशील विषयात विरोधी पक्षातील 99 टक्के नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या नाहीत. त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. मी विरोधी पक्षाचं, शिवभक्तांचं अभिनंदन करतो". 


"वाघनखं आणण्यासाठी भाडं दिलं जाणार आहे असा दावा केला जात आहे. पण एकही नवीन पैशांचं भाडं दिलेलं नाही आणि दिलं जाणार नाही. वाघनखं आणण्यासाठी करोडो रूपये खर्च झालेला नाही. आपल्या एका दिवसाच्या अधिवेशनाचा आहे त्यापेक्षाही कमी खर्च झाला आहे. जाणे, येणे, करार करणे यासाठी फक्त 14 लाख 8 हजार खर्च झालाय. हा गैरसमजही दूर करण्याची गरज आहे," असा दावा सुधीर मुनगंटीवरार यांनी केला आहे. 
 
"वाघनखं ठेवण्यासाठी 7 कोटी खर्च केला जात असल्याचं बोललं जात आहे. यासाठी कोणताही खर्च केलेला नाही. हा खर्च इतर शस्त्रं, प्रदर्शन, नूतनीकरण डागडुजीसाठी केलेला खर्च आहे," अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरल्याचा कुणीही दावा केला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्याभिषेकासंदर्भात एक पुस्तिका सर्वांना दिली जाईल. हा संवेदनशील विषय आहे. मनात शंका उपस्थित झाल्यास ती भेटून त्याचं निरसन करा असं आवाहनही त्यांनी केलं.