उद्धव ठाकरेंची भाजप कार्यकर्त्यांना साद, विधानसभेच्या रणधुमाळीत नवी खेळी!
Uddhav Thackeray Appeal: विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा संघर्ष आहे.
Uddhav Thackeray Appeal: सिल्लोडमधील हुकुमशाही, गुंडगिरी, दडपशाही रोखण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी साथ द्यावी, अशी साद उद्धव ठाकरेंनी भाजप कार्यकर्त्यांना घातलीय. मतभेद असतील तर त्यांच्याशी बोलायला तयार असल्यचंही उद्धव ठाकरे म्हणालेत. सुरेश बनकरांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. सिल्लोडमधील गुंडगिरी आणि हुकुमशाही संपवायची असल्याचंही ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा संघर्ष आहे. असं असतानाही उद्धव ठाकरेंनी सिल्लोडमध्ये भाजप कार्यकर्त्यांना मशालच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलंय. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात सुरेश बनकर रिंगणात आहेत. सुरेश बनकर हे मूळचे भाजप कार्यकर्ते आहेत. अब्दुल सत्तारांना हरवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी बनकरांना पाठिंबा देण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंना केलंय. अब्दुल सत्तारांना पराभूत करण्यासाठी कोणी चर्चेला यायला तयार असेल तर त्यांनी यावं असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय.
ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही अशी असल्याचं उद्धव ठाकरें सांगतात. त्यामुळं महाराष्ट्रद्रोह करणाऱ्यांना मतदान करु नका असं आवाहनही ठाकरेंनी केलंय.
सिल्लोडमध्ये बनकरांसाठी भाजप कार्यकर्ते वेगळी भूमिका एकवेळ घेतीलही पण राज्यात भाजप उद्धव ठाकरेंना छुपी मदत करण्याची शक्यता फारच कमी आहे. तरीही उद्धव ठाकरेंनी भाजप कार्यकर्त्यांना मतदानासाठी केलेलं आवाहन बुचकाळ्यात टाकणारं आहे.
भाजपवर टीका
मी सोबत होतो तेव्हा त्यांची लुटालूट होत नव्हती. आता ते ओरबाडून खायला चाललेयत. आता देशाच्या राजधानीला ते संपवायला निघालेत. 2014-2019 पासून जेव्हा नेतृत्व बदललं, तेव्हापासून आमचा विरोध सुरु झाला. त्यांच्या लुटीत त्यांना उद्धव ठाकरे अडथळा वाटत होता, असे ते म्हणाले.मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मला अनेक गोष्टी माहिती होत्या. कोण कपडे बदलून जात होतं, त्यांची माहिती मला होती. पण या गद्दारांना मला जाण्यापासून अडवायचे नव्हते. म्हणून त्यांना जाऊ दिलं. मी मुख्यमंत्री म्हणून त्यांना अडवू शकलो असतो, असे ठाकरे यावेळी म्हणाले. 2014 ला युती मी तोडली नव्हती. एकनाथ शिंदेंना सांगण्यात आलं होतं तुम्ही फोन करा आणि सांगा युती तोडली. 2019 ला त्यांनी दिलेला शब्द मोडला. माणूस एवढा कसा बिघडू शकतो, हे पाहून मला वाईट वाटलं. त्यांनी माझ्या शब्दाला किंमत नाही दिली, असे ते फडणवीसांबद्दल म्हणाले. महाराष्ट्रद्रोह सोडा, महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला जाऊ देणार नाही, हे जाहीर करा. यांच्या नसानसातला महाराष्ट्रद्रोह जाणार नाही. त्यामुळे पुढे जाऊन एकत्र येण्याची शक्यता नाही, असे ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र लुटून गुजरातला नेण्याचा प्रकार
महाराष्ट्र लुटून गुजरातला नेण्याचा प्रकार सुरु झाला तेव्हापासून माझा प्रचार सुरु झाला. मी मुख्यमंत्री असताना कटेंगे-बटेंगे नव्हते. त्यांची सत्ता जिथे होती तिथेच लुटेंगे बाटेंगे आहे. आणि हीच त्यांच्या पक्षाची भूमिका. भाजप हा संकरित पक्ष आहे. माझं सरकार होतं तेव्हा हिंदू कुठे कापला गेला? मोदींच्या राज्यात असं होत असेल तर मोदी अकार्यक्षम आहेत. 10 वर्षे होऊनदेखील त्यांना हे वाटत असेल तर त्यांनी पद सोडलं पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. महिलांना रोजगार मिळत नाही, रोजगार गुजरातला जातायत यावर ते का बोलत नाहीत? कुठे एअरपोर्टचे छत गळतंय, राम मंदिर गळतय आता त्यांचे तुटेंगे तो फटेंगे सुरु आहे. अमित शाह, नरेंद्र मोदी यांचे भाषण जनतेच्या प्रश्नाशी संबंधित नव्हते. यावेळेस उद्धव ठाकरेंवरच्या टिकेची धार कमी झाली कारण त्यांना लोकसभेला उत्तर मिळाल्याचे ते म्हणाले.