Maharashtra Assembly Winter Session 2023 : राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटलेला आहे. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनातही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चर्चा सुरु आहे. अशातच विधान परिषदेत उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद सुरु झाला आहे. मराठा समाजासाठी असलेल्या ‘सारथी’ संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. मात्र फक्त 200 विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे ही संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी विधानसभेत केली होती. त्यावर उत्तर देताना अजित पवार (Ajit) यांनी पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार आहेत? असा सवाल केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार यांच्या या विधानाने आमदार सतेज पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्यानंतर सतेज पाटील यांनी, दादा असं काय म्हणताय तुम्ही, या योजनेमुळे राज्यात पीएचडीधारकांची संख्या वाढेल. बार्टी, सारथी किंवा महाज्योतीसारख्या संस्थांमुळे पीएचडीधारकांची संख्या वाढेल आणि याचा राज्याला फायदाच होईल. त्याने काही नुकसान होणार नाही, असे म्हटलं होतं. मात्र आता अजित पवार यांचे हे विधान सोशल मीडियावर देखील व्हायरल होत असून त्यांच्यावर टीका केली जात आहे. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मोदींनी पकोडे तळायला सांगितलं आहे ना, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


नेमकं काय घडलं?


मंगळवारी विधान परिषदेत सतेज पाटील हे प्रश्नोत्तराच्या तासावेळी सारथीद्वारे दिल्या जाणाऱ्या फेलोशिपच्या मुद्द्यावरुन सरकारला प्रश्न विचारला होता. 'पीएचडी करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना आशा होती की त्यांना सारथीकडून फेलोशिप मिळणार आहे,' असे सतेज पाटील म्हणाले. त्यावर अजित पवार यांनी फेलोशिप घेऊन ते काय करणार आहेत? असा सवाल केला. यावर उत्तर देताना सतेज पाटील म्हणाले की, हे विद्यार्थी पीएचडी घेतील. यावर उत्तर देताना अजित पवार यांनी 'पीएचडी करून काय दिवा लावणार आहेत?' असे विधान केले. यावर प्रत्युत्तर देताना सतेज पाटील यांनी, बार्टी, सारथी किंवा महाज्योतीसारख्या संस्थांमुळे पीएचडीधारकांची संख्या वाढेल आणि याचा राज्याला फायदाच होईल. त्याने काही नुकसान होणार नाही, असे म्हटलं होतं. 



दरम्यान, या प्रश्नावर उत्तर देताना महाज्योती, सारथीला समान निधी, समान निकष राहतील असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे वरिष्ठ महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये साहाय्यक प्राध्यापकांच्या नोकरीसाठी पीएच.डी पदवी आवश्यक असल्याने मोठ्या संख्येने विद्यार्थी ही पदवी घेतात.