मुंबई : भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारानंतर महाराष्ट्र पेटला असून आज महाराष्ट्र बंद पाळला जात आहे. या घटनेचे पडसाद राज्यभरात बघायला मिळत आहे. सुरवातीला शांततेत सुरू झालेला महाराष्ट्र बंदने तोडफोडी रूप धारण केले. अनेक ठिकाणी बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. जाणून घेऊया राज्यातील विविध शहरांमधील दुपारी एक वाजेपर्यंत काय काय घडलं याच्या अपडेट...


नाशिकमध्ये सहा बसेसची तोडफोड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमध्ये मंगळवारी शहर वाहतूक करणा-या सहा बसेसची तोडफोड झाली. मंडळाची खबरदारी म्हणून शहरासह अनेक बसच्या फे-या कमी केल्या जातायत.


धुळे-नंदुरबारमध्येही तोडफोड


धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात बंद दरम्यान शिरपूर एस टी आगारातील दोन बसची तोड फोड करण्यात आली आहे. यात काही प्रवासी जखमी झाले आहेत. पोलीसांनी एका संशयीताला ताब्यात घेतले आहे. जिल्ह्यात शिक्षण विभागाने सुट्टी जाहीर केली नसली तरी अनेक शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर बहूतांश पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवलेले नाही. बस सेवा विस्कळीत झाल्यामुळे या बंदचा सर्वाधीक फटका प्रवाशांना बसला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील शेतमाल बेताचाच आला होते. तर ग्राहकही तोडकेच होते. संवेदनशील ठिकाणी पोलीसांनी कालपासुनच बंदोबस्त लावला आहे. अफवा पसरवीणा-यांवर पोलीसांची करडी नजर आहे.


पुण्यातही हिंसक वळण


पुण्यात भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चाला हिंसक वळण लागलं. पुण्यात खबरदारीचा उपाय म्हणून दांडेकर पूलावरची वाहतूक बंद ठेवण्यात आलीय.


साता-यात तणावपूर्ण शांतता


आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये सातारकर सहभागी झालेत. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून साता-यातील सर्व व्यवहार बंद झाले आहेत. सातारा, कराड, पाटण, वाई, फलटण,  म्हसवडमधील सर्व बसजारपेठा बंद होतायत. एसटी सेवाही बंद करण्यात आल्यानं सातारा बस स्थानकावर शेकडो प्रवाशी खोळंबून पडलेत. या पार्शवभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. शहरात कडकडीत बंद असल्यानं शहरातील व्यापारी पेठाही बंद आहेत. शहरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून यामुळे साता-यात तणावपूर्ण शांतता आहे.


सोलापूरात तणावपूर्ण शांतता


प्रकाश आंबेडकरांसह अनेक दलित संघटनांनी पुकारलेल्या बंदचा परीणाम सोलापूरात जाणवतोय. शहरातील प्रमुख बाजारपेठा अद्याप उघडल्याच नाहीत. पोलिसांची फिरती गस्त आणि ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. शहरात तणावपूर्ण शांतता आहे. 


सांगलीत सर्व व्यवहार बंद


भीम सैनिकांनी आज सांगली बंदचे आयोजन केलं आहे. सांगलीतील प्रमुख बाजारपेठा बंद असून, सर्व व्यवहार बंद आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळाच्या शाळेना सुट्टी देण्यात आली आहे. तर सांगलीतील बसेस सेवा बंद करण्यात आली आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


गुहागर एसटी बसची तोडफोड


गुहागर तालुक्यातील आबलोलीमध्ये एसटी बसच्या अज्ञातांनी काचा फोडल्या. त्यामुळे या मार्गावरील एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आलीय. तर आबलोलीमध्ये भीमा कोरेगावच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी गुहागर-रत्नागिरी मार्गावर आबलोली गावात रास्तारोको करण्यात आला. महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला गुहागर तालुक्यातील आबलोलीत चांगला प्रतिसाद मिळतो. आबलोलीतील बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आलीय. 


रत्नागिरीत शांतता


रत्नागिरीत एसटी सेवा, शाळा आणि महाविद्यालयं व्यवस्थित सुरू आहेत. काही वेळापूर्वी जयस्तंभाजवळ आंदोलन करण्यात आलं. शहरातला मुख्य रस्ता आंदोलकांनी रोखल्यामुळं ४ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळं रत्नागिरीकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक पूर्ववत झाली.